अनोळखी व्यक्तीकडून नवनीत राणांचे फोटोशूटरुग्णालयाचा दावा : गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : खासदार नवनीत राणा यांच्या एमआरआयमधील फोटो विरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत वांद्रे पोलिसांत तक्रार दिल्यानंतर, लीलावती रुग्णालयानेही पोलिसांत धाव घेत फोटो काढणाऱ्या विरोधात तक्रार दिली आहे. रुग्णालयाच्या सुरक्षा सुपरवायझरच्या तक्रारीवरून फोटो काढणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी वांद्रे पोलिसांत तक्रार देत, रुग्णालय प्रशासन आणि राणा यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी चौकशी सुरू असताना बुधवारी, लीलावती रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक सुपरवायझर अमित गौड (३८) यांच्या फिर्यादीवरून वांद्रे पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
गौड यांच्या तक्रारीनुसार, ६ मे रोजी नवनीत राणा या पाठ आणि मानदुखीमुळे रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. ६ आणि ७ मे रोजी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांना एमआरआय तपासणी करण्यास सांगितले. त्यानुसार, ६ मे रोजी रात्री १० च्या सुमारास त्यांना एमआरआय कक्षात नेण्यात आले. त्यावेळी रवी राणा यांचे सुरक्षा रक्षक तसेच एक पांढरा शर्ट घातलेला अनोळखी व्यक्ती उपस्थित होता. यावेळी अनोळखी व्यक्तीने कुठलीही परवानगी न घेता नवनीत राणा यांचे एमआरआयमधील ट्रॉलीवर रुग्णाची तपासणी सुरू असताना त्याचे फोटो घेतले. तसेच ते माध्यमांना देत, सोशल मीडियावर व्हायरल केले असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
पोलिसांकडे दिले सीसीटीव्हीचे फुटेज लीलावती रुग्णालयाची नियमावली असून, एमआरआय कक्षातील इलेक्ट्रॉनिक वस्तू व धातूच्या वस्तू नेण्यास मनाई आहे. तसेच ठिकठिकाणी नो फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी लिहिले असल्याचे नमूद केले आहे. संबंधित फोटोग्राफीचे सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद असून ते फूटेजही पोलिसांना देण्यात आले आहेत. या तक्रारीवरून पोलिस फोटो घेणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.