Sharad Pawar : राज्यासह देशात गेल्या दोन-तीन दिवसांपासून शरद पवार हे नाव तुफान चर्चेत होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी २ मे रोजी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पक्षातील अजित पवार वगळता सर्वच नेतेमंडळी, कार्यकर्ते यांनी पवारांना राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यायची विनंती केली. त्यानंतर अखेर तीन दिवसांनी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय मागे घेतला व पक्षाध्यक्ष पदावर कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला पक्षाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार उपस्थित होते. अजित पवारांची अनुपस्थितीही साऱ्यांनाच जाणवली. यासोबतच, पत्रकार परिषदेत आणखी चेहरा चर्चेत राहिला. पिवळ्या रंगाचा कुर्ता घातलेली आणि शरद पवारांच्या अगदी मागेच बसलेली ती महिला नक्की कोण? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला. जाणून घेऊया तिच्याबद्दल...
शरद पवार यांच्यासाठी २ मे हा दिवस महत्त्वाचा होता, त्याचप्रमाणे आजचा दिवसही तितकाच महत्त्वाचा होता. आज शरद पवार आपल्या पत्नीसह पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आले होते, मात्र मूळ पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी उपस्थित राहिल्या नाहीत. शरद पवार यांच्या शेजारी पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बसले होते. त्यांच्या मागे पवारांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार बसले होते. त्यासोबतच आणखीही काही नेते व पक्ष संघटनेतील पदाधिकारी बसले होते. या गर्दीत लक्ष वेधून घेतले ते पवारांच्या मागेच बसलेल्या एका महिलेने... पिवळ्या रंगाचा कुर्ता घालून ती महिला पत्रकार परिषदेत हजर होती. या महिलेचे नाव सोनिया दूहन (Sonia Doohan)
सोनिया दूहन कोण आहे?
सोनिया दूहन या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आहेत. त्या सध्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. सोनिया दूहन या २०१९ मध्ये चर्चेत आलेल्या होत्या. महाराष्ट्रात जून २०२२ ला नवीन सरकार स्थापन झाले आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे गटातील आमदारांनी जशी बंडखोरी केली होती, तसाच काहीसा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही २०१९ ला घडला होता. या गोष्टींशी सोनिया दूहन यांचा संबंध आहे. सोनिया दूहन यांनी 2019 मध्ये हरियाणातील गुरुग्राममधून राष्ट्रवादीच्या आमदारांची सुटका करून, अजित पवार गटासह भाजपचे महाराष्ट्रात सरकार स्थापनेचे स्वप्न मोडले होते.
शिंदे गटाच्या बंडखोरीशी काय आहे कनेक्शन...
शिंदे गट जेव्हा बंडखोरी करून सुरतपासून गुवाहाटी आणि नंतर गोव्यात गेला, त्यावेळीही सोनिया दूहन या त्यांच्या मागावर होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आमदारांशी संपर्क साधण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी झालेही होते, मात्र उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आणि भाजपच्या गोटातून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा झाल्यानंतर बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न फेल गेले. या दोन्ही प्रयत्नांमुळे काही लोक सोनिया दूहन यांना राष्ट्रवादीची 'लेडी जेम्स बाँड' देखील म्हणतात.