मुंबई : महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष कोणता ? मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण ? यावरून काँग्रेस आणि उद्धव सेनेतील मतभेद समोर आले आहेत. यापूर्वी लोकसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ असल्याचे विधान केले होते. काँग्रेसकडून वारंवार होणाऱ्या या विधानांचा उद्धव सेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष असल्याचे विधान काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मध्यंतरी केले होते. पटोले, चेन्नीथालांच्या विधानांबाबत खा.राऊत यावर म्हणाले की मविआत आघाडीत कोणी लहान भाऊ, मोठा भाऊ असे काही नाही. जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा अजून काही आहोत, उंच भाऊ आहोत, तर त्यांना सांगू इच्छितो की त्यांच्या जागा वाढण्यात आमच्या पक्षाचे योगदान किती याचा त्यांनी अभ्यास करायला हवा.
रमेश चेन्नीथला स्वतः म्हणाले होते, महाविकास आघाडीत कोणी लहान भाऊ, मोठा भाऊ असे कोणीही नाही. महाविकासआघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत. आम्ही एकत्र निवडणुका लढू. पण आता जर कोणाला अशी खुमखुमी असेल लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ, धाकटा भाऊ तर मग महाराष्ट्रात काय चित्र आहे ते भविष्यात कळेल, असा टोला राऊत यांनी हाणला.
अमरावती, रामटेक , कोल्हापूर या २०१९ मध्ये जिंकलेल्या जागा आम्ही त्यांना दिल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या वाढल्या. हे जर ते विसरले असतील किंवा विसरत असतील तर ते योग्य नाही. पण मी परत सांगतो की काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशाप्रकारची भूमिका घेणार नाहीत, असेही ते म्हणाले.
मविआत लहान भाऊ, मोठा भाऊ हा विषय नाही. तुम्ही राऊतांचं फार ऐकत जाऊ नका, अशा शब्दात नाना पटोलेंनी संजय राऊतांना सुनावले आहे.