पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची आज दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शरद मोहोळची हत्या कुणी आणि का केली? तसेच या हत्येनंतर पुण्यात गँगवॉर उफाळणार का, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, आज पुण्याच्या दौऱ्यावर असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.
शरद मोहोळ याच्या हत्येबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यात कुठलाही गँगवॉर होणार नाही. पुण्यात कुख्याद गुंड शरद मोहोळ याची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली आहे. गुंड कुणीही असो, या सरकारमध्ये त्याचा बंदोबस्तच केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवॉर कुणी पुण्यात करणार नाही.
दरम्यान, कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आला होता. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी शरद मोहोळ यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. यामध्ये शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती होती. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार होता. मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल होते. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केल्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक झाली. येरवडा कारागृहात शरद मोहोळने विवेक भालेराव याच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागाचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला. या प्रकरणात शरद मोहोळला जामीन मिळाला. मात्र बाहेर आल्यानंतर त्याची गुन्हेगारी कृत्य सुरुच होती. जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडिपार करण्यात आले होते.