अतुल कुलकर्णीमुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाची नेमणूक करायची याचा निर्णय आधी विरोधकांनी एकत्र बसून घ्यावा लागेल. त्यानंतर तो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना कळवावा लागेल, तसा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर अध्यक्ष नेमून देतील त्या दिवशी विरोधी पक्ष नेता निवडला जाईल.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २५ जूनपासून सुरू होणार आहे. त्याच अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्पही सादर केला जाणार आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याशिवाय अर्थसंकल्प सादर करू द्यायचा की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले. विधानसभेत काँग्रेसचे ४२ सदस्य आहेत. त्यापैकी कालिदास कोळंबकर भाजपच्या वाटेवर आहेत तर नितेश राणे यांची भूमिका स्पष्ट नाही. शिवाय विखेही भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.
विरोधी पक्ष नेतेपदासाठी आज कागदोपत्री तरी काँग्रेसची संख्या अबाधित आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, काँग्रेस त्यांचा पर्याय शोधेल. त्यांच्याकडे नेते आहेत. शिवाय व्हीप काढला तर सगळ्यांना मतदान करावे लागेल. या पदासाठी काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आहे; मात्र त्यावर आज काही बोलणे योग्य होणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.
अधिवेशन सुरू होण्याआधीच काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले तर या पदावर राष्ट्रवादी दावा करेल. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापैकी एकाचे नाव पुढे केले जाईल असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. राष्ट्रवादीचे ४१ आमदार आहेत. बहुजन विकास आघाडीचे ३, एमआयएमचे २, समाजवादी, भारिप, कम्युनिस्ट असे प्रत्येकी एक व ७ अपक्ष आमदार आहेत.
लोकसभेच्या निकालावर गणिते अवलंबूनसप्टेंबरमध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका होतील त्याआधीचे फक्त एकच अधिवेशन बाकी आहे. त्यामुळे एका अधिवेशनापुरते विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळेल? बहुतांश विरोधी सदस्यांची भूमिका आज जरी अजित पवार यांच्या बाजूने असली तरी लोकसभेचे निकाल लागल्यानंतर काय राजकीय चित्र राहील यावर सगळी गणिते अवलंबून असतील.