उस्मानाबाद : येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक कविवर्य ना.धों. महानोर यांना तुम्ही संमेलनाला जाऊ नका, असा फोन आला होता़ परंतु, महानोर संमेलनास उपस्थित राहणार आहेत असं सांगण्यात येत आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला वैचारिक वादळ उठले आहे. संमेलनाचे उद्घाटक महानोर यांनी संमेलनास उपस्थित राहू नये, अशा आशयाचा संदेश फोनवरुन त्यांना देण्यात आला आहे. यासंदर्भात महानोर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांचे नातू शशिकांत म्हणाले, होय, फोन आला होता, तुम्ही संमेलनाला जाऊ नका, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु, महानोर ठरल्याप्रमाणे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
१० जानेवारीला सुरु होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून फादर दिब्रिटो यांना आमचा विरोध आहे तसेच महानोर यांनी अनुपस्थित रहावे, असे आवाहनही आम्ही केले आहे, असा संदेश सोशल मीडियातून फिरत आहे. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिब्रिटो यांचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवलं होतं. त्यानंतर 93 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली होती. मात्र त्यांच्या निवडीला अनेकांनी विरोध केला होता.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं साहित्य ख्रिस्ती धर्मावर आधारित असून मराठी साहित्यात दिब्रिटो त्यांचे काम नाही असा आरोप करण्यात येत असून अध्यक्षपदी झालेली त्यांची निवड थांबवावी अशी मागणी काही हिंदुत्ववादी संघटनांतर्फे करण्यात येत होती. मराठी साहित्यात अनेक मोठे साहित्यिक असताना दिब्रिटो यांच्यासारख्या धर्मांध व्यक्तीला असे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देणे चुकीचे आहे अशी नाराजी काहींनी व्यक्त केली होती.