पुणे : पेरणेफाटा येथे असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात़ या घटनेला २०० वर्षे झाल्यानिमित्ताने अभिवादन कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले़ त्यातून कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी मोठी दंगल झाली़ त्याच्या आदल्या दिवशी पुण्यात शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर रोजी एल्गार परिषद झाली होती़ या एल्गार परिषदेवरुन आता राजकारण खुप तापले आहे. मात्र, त्यामुळे कोरेगाव भीमा येथील दंगल नेमकी कोणी घडविली की घडवून आणली, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या दंगलीमागे नेमका कोणाचा हात होता, याचा छडा लावण्याचे सर्वात मोठे आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांवर पर्यायाने राज्य शासनावर आहे. मात्र, राजकारणात नेमके त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगली संदर्भात शिक्रापूर पोलिसांकडे एकूण २२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात आतापर्यंत ११४ जण निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यात आली होती. ते सर्व जण आता जामीनावर सुटले आहेत. या गुन्ह्यांपैकी काही गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात याबाबत एक स्वतंत्र सेल तयार करण्यात आला होता. या सेलमध्ये असलेल्या दोन्ही पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे. त्यामुळे सध्या या सेलचे काम जवळपास ठप्प झाले आहे. या दंगलीत राहुल फटांगडे या तरुणाचा मृत्यु झाला होता. त्यातील आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती. तो गुन्हा सध्या तपासासाठी राज्य गुन्हे अन्वेषणकडे तपासासाठी सोपविण्यात आला आहे.
एल्गार परिषदेत जाणिवपूर्वक तपास वेगळ्या दिशेने व काही जणांना त्रास देण्यासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, त्याचवेळी दोन वर्षे होऊनही कोरेगाव भीमा दंगलीचा तपास पूर्ण झाला नाही. पोलिसांनी जे आरोपी पकडले, ते सीसीटीव्हीत निष्पन्न झाले होते, त्यांच्यावर कारवाई झाली आहे.मात्र, त्यांना दंगली घडविण्यासाठी कोणी प्रोत्साहित केले, ते तेथे खरंचे आले होते की त्यांना आणले गेले होते, याची माहिती अजूनही पुढे आलेली नाही. यातील २२ गुन्ह्यांपैकी एकाचाही खटला अद्याप सुरु झालेला नाही़ एल्गारमध्ये ज्याप्रमाणे काही लोकांना जाणीवपूर्वक डांबले गेले असले म्हटले जाते. कोरेगाव भीमाची दंगल ही उजव्या विचाराच्या लोकांनी घडविल्याचा आरोपही केला गेला आहे. त्यामुळेच यातील सत्य पुढे येऊ नये, यासाठी हा तपास रेंगाळला गेला आहे का? ही दंगल खरंच घडविली गेली असेल तर त्यामागील नेमके कोणाचे हात होते, हे सत्य बाहेर आणण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांबरोबरच राज्य शासनावर आहे.