कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यांत ज्यांनी काँग्रेस संपवली त्यांच्याकडे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद दिले आहेच परंतू महाराष्ट्रात तरी या पक्षात आता कोण राहिले आहे, सारे नेते सैरावैरा पळाले असल्याची टीका माजी खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी येथे महायुतीच्या प्रचारसभेत केली. येथील तपोवन मैदानावर ही सभा झाली.माजी खासदार महाडिक म्हणाले,‘ भाजप हा सतरा कोटी सभासद असलेला जगातला मोठा पक्ष बनला आहे आणि दुसरीकडे काँग्रेसची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली आहे. त्याचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी सध्या कुठे आहेत..? राज्यातील नेतेही गर्भगळीत झाले असून सैरावैरा पळत सुटले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात या पक्षांतच आता कोण शिल्लक राहिलेले नाही. ज्यांनी लोकसभा निवडणूकीत महायुतीचा प्रचार केला, त्यांनाच जिल्ह्याचे अध्यक्षपद सोपवले गेले आहे.’कोल्हापूर दक्षिणमधील निवडणूक ही दोन पक्षांच्या कारभारावर, नीतमत्तेवर होत नसून ती द्वेषावर होत असल्याची टीका करून महाडिक म्हणाले,‘ गेल्या निवडणूकीत अमल निवडणूकीस उभे राहिले तेव्हा आम्हांला चिंता होती. कारण ते अत्यंत लाजाळू आहे. त्यांना प्रश्र्न सोडवून घ्यायला जमेल का असे वाटत होते. परंतू त्यांनी केलेली कामे पाहून माझेही डोळे पांढरे झाले आहेत.
याउलट आमचे विरोधक अमलऐवजी गोकुळचा कारभार, महाडिक कुटुंबियांवर वैयक्तिक टीका करत आहेत. ते सत्तेत असताना त्यांनी कोल्हापूरसाठी काय केले हे जाहीर करावे. थेट पाईपलाईनसाठी आमदारकी पणाला लावली परंतू त्याचे पाणी आमच्या नातवंडांना तरी मिळेल का नाही अशी शंका मला वाटत आहे.’