लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा नावलौकीक वाढविण्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण एकसंघ राहून अखंडपणाने करत राहू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादीकडून खास व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार, खासदार तसेच सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. आज मला सन्मानित केलात याचा आनंद आहे. परंतु, माझी वयाची ८२ वर्षे पूर्ण झाली आणि ८३ व्या वर्षात पदार्पण करतोय याची आठवण का करुन देता अशी मिश्किल टिप्पणी पवार यांनी करताच सभागृहात एकच हशा पिकला. लोकशाहीच्या मार्गाने राज्य आल्यानंतर त्याला विरोध करायचा नसतो. परंतु राज्यकर्त्यांनी सुध्दा सबंध देशातील प्रांताकडे बघताना आपण देशाचे नेतृत्व करतो आहोत याचे भान ठेवले पाहिजे असे खडेबोलही पवार यांनी सुनावले.
समृद्धीला कुणी विरोध केला? समृद्धी महामार्गाला कुणी विरोध केला हे माहिती नाही. औरंगाबादला गेलो असताना शेतकऱ्यांनी माझी भेट घेतली. या रस्त्यासाठी जमिनी घेत आहेत. परंतु जमिनीची रास्त किंमत देत नाहीत, असे त्यांनी सांगितले. मी स्वतः त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांना कॉल केला आणि ज्यांच्या जमिनी घेत आहात त्यांना रास्त किंमत द्या, असे सुचवले होते. राष्ट्रवादीने समृद्धीला विरोध केला नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.