लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बससेवेत शिस्त आणण्यासाठी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी काही कठोर निर्णय घेतले आहेत. त्याचा फटका खासगी ठेकेदारांनाही बसला. त्यामुळे त्यांनी प्रवाशांना वेठीस धरून बंदचे हत्यास उपसले. मात्र, प्रवाशांचे हित पाहून बससेवा सुधारण्यासाठी मुंढे यांनी उचललेले पाऊल योग्य असल्याबाबत प्रवाशांसह काही राजकीय नेत्यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. मग काही जणांकडून मुंढे यांच्या भूमिकेला कुणासाठी विरोध केला जात आहे, अशी चर्चा रंगली आहे.मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून बेशिस्त कर्मचारी-अधिकारी यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. बेशिस्त बससेवेला शिस्त लावण्यासाठी त्यांनी ठेकेदारांनाही ताकीद दिली. तसेच, ब्रेकडाऊन रोखण्यासाठी ५ हजार रुपये तर बसथांब्यावर बस न थांबविणे, वेळेपूर्वी बस हलविणे अशा विविध कारणांसाठी १०० रुपये दंड आकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे मागील ३ महिन्यांत पाचही ठेकेदारांना तब्बल १७ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला. मुंढे यांनी उचललेले हे पाऊल प्रवासी हितासाठीच आहे. मार्गावर वारंवार बस बंद पडल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बस थांब्यावर न थांबविल्यामुळे प्रवाशांना तासन् तास थांब्यावर उभे राहावे लागते. तर, वेळेआधीच थांब्यावरून बस हलविल्याने काही वेळा अपघातही झाले आहेत. या गंभीर बाबींचा विचार करून मुंढे यांनी ठेकेदारांच्या बससेवेत शिस्त आणण्यासाठी कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे.मात्र, त्यांनी प्रवासी हितासाठी घेतलेली ही भूमिका काहींना पटलेली दिसत नाही. विविध मुद्द्यांवर त्यांना कोंडीत पकडून विरोध करण्याचे प्रकार वाढले आहेत. प्रवाशांकडून मुंढे यांच्या कारवाईला पाठिंबा मिळत असताना काही नेत्यांकडून त्यांना कुणासाठी आणि कुणाच्या सांगण्यावरून टार्गेट केले जात आहे, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
मुंढेंच्या भूमिकेला विरोध कुणासाठी?
By admin | Published: July 01, 2017 7:58 AM