जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना तिथे पोलिसांकडून लाठीमार झाला होता. या लाठीमारानंतर राज्यभरातून जनक्षोभ उसळला होता. तसेच या लाठीमारावरून पोलीस अधिकारी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. तसेच लाठीमाराचे आदेश वरून म्हणजेच गृहमंत्रालयातून दिले गेल्याचेही आरोप झाले होते. दरम्यान, याबाबत आरटीआयमधून मागणवण्यात आलेल्या माहितीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अंतवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नव्हते, अशी माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. जालना जिल्हा जन माहिती माहिती अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक (गृह) आर.सी. शेख यांनी ही माहिती दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी ही माहिती मागवली होती.
जालना जिल्ह्यातील अंतवारील सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून बेछूट लाठीमार झाला होता. त्यामध्ये अनेक आंदोलक हे जखमी झाले होते. तसेच या लाठीमारादरम्यान झालेल्या प्रतिकारामध्ये अनेक पोलीसही जखमी झाले होते. या लाठीमारानंतर मराठा आरक्षण आंदोलन अधिकच तीव्र झाले होते. तसेच या लाठीमाराच्या आदेशांसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोषी ठरवण्यात येत होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. दरम्यान, माहितीच्या अधिकारामधून समोर आलेल्या माहितीमुळे देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे.