ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि. १७ - नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली तेव्हा तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस - राष्ट्रवादीला आरोपीच्या पिंज-यात उभे करण्यात आले होते. आता कॉ. गोविंद पानसरेंवर हल्ला झाला असून या हल्ल्याची जबाबदारी कोणाची ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
कोल्हापूरमध्ये कॉ. गोविंद पानसरेंवर सोमवारी प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सामनामधून भाजपावर निशाणा साधला. कॉ. गोविंद पानसरे हे कडवट पुरोगामी असला तरी त्यांना त्यांचा विचार मांडण्याचा अधिकार असून अशाप्रकारचे भ्याड हल्ले त्यांचे भाषण व लिखाण स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. पानसरे व त्यांच्या वृद्ध पत्नीवर हल्ला करणे हे षंढपणाचे लक्षण आहे असेही त्यांनी नमूद केले. दिवसाढवळ्या पानसरेंवर हल्ला झाला असून याची जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित करत राज्यातील कायदा व सुव्यस्थेचे धिंडवडे निघाले असून गुन्हेगार मोकाट सुटल्याची ओरड केल्यास राज्य सरकारही आपलेच आहे, आज दुसरे सरकार असते तर त्यांना शब्दांनी चोपले असते असा चिमटाही त्यांनी काढला आहे.
ओवेसी छाप लोक येऊन जातात पण त्यांना प्रत्युत्तर फक्त शिवसैनिकच देऊ शकतात. पण गोविंद पानसरेंवर हल्ला करणा-यांना भलचात चेव चढला असून नवीन राज्यसरकारने हे चित्र बदलावे अशी मागणी केेली.