सातारा : डॉक्टरांच्या हत्येनंतर ‘अंनिस’ पोरकी झाली असली तरी ती खचून गेली नाही. कारण डॉक्टर आज लौकिक अर्थाने आपल्यात नसले तरी त्यांचा विचार आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे. आणि म्हणूनच ‘अंनिस’चे कार्य महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्ये ताकदीने सुरू आहे.दि. २० आॅगस्ट २०१३ रोजी डॉ. दाभोलकर यांची पुण्यात हत्या झाली. त्यानंतर राज्यभर आंदोलने, निदर्शने झाली. मात्र आज दोन वर्षांनंतरही मारेकऱ्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. मात्र, ज्याच्यासाठी डॉक्टरांनी हयातभर वैचारिक लढाई केली तो जादूटोणाविरोधी कायदा महाराष्ट्र सरकाने हत्येनंतर सहा दिवसांनी दि. २६ रोजी लागू केला. डॉक्टर गेल्याची उणीव नेहमीच जाणवते; पण त्यांनी जो विचार कार्यकर्त्यांच्या मनात पेरला आहे, तो विवेकवाद तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ‘अंनिस’वर होती. त्यामुळे राज्यभर विवेक निर्धार परिषदा घेतल्या. जळगाव येथे जातपंचायत मूठमाती संघर्ष परिषद घेतली. भोंदूबाबांच्या विळख्यात अडकलेल्यांची सुटका केली, अशी माहिती ‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस प्रशांत पोतदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्यासाठी अनेक ठिकाणी चर्चासत्रे घेतली. अघोरी प्रथांचा बिमोड करण्यासाठी ३५ जिल्ह्यांमध्ये प्रबोधन यात्रा काढली. मध्यप्रदेशमध्ये भूतांची यात्राप्रकरणी भेट देऊन प्रबोधन केले. लोकांशी संवाद साधून प्रबोधन केले. कायदाविषयी राज्यभर शिबिरे घेतली. (प्रतिनिधी)भोंदूबुवांची दुकाने बंद....डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी शेवटपर्यंत विवेकी विचाराने अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले. ते नेहमी सांगायचे, ‘लोग मेरी बात मानेंगे जरुर लेकिन मेरे मरने के बाद...’ आज त्यांचे बोल खरे ठरत असल्याचे दिसत आहे. जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत कारवाया होऊन अनेक भोंदूबुवांची दुकाने बंद होत आहेत. लोक अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त होत आहेत. लोकांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक कळू लागला आहे. दोन वर्षं पूर्ण झाले तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी सापडत नाही, ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. मारेकऱ्यांचा तपास अजूनही सुरूच आहे आणि तो ही संथ गतीने. जनतेच्या भावनांचा उद्रेक होण्याअगोदर सरकारने तपासाची गती वाढवून मारेकऱ्यांना लवकर जेरबंद करावे.- विशाल निकम, (सातारा)अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी सुरु केलेली चळवळ ही पुढेही सुरूच राहील. मात्र, त्यांच्या मारेकऱ्यांना कठोर शासन होणे गरजेचे आहे. त्यांच्या हत्येला दोन वर्ष होवूनही मारेकरी सापडत नाही ही लाजीरवाणी आणि मनाला न पटणारी गोष्ट आहे. प्रशासनाने आता तरी कठोर पाउले उचलावीत. - संदीप शेलार,(म्हसवे, सातारा)दाभोलकर आणि पानसरे यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आली आहे. सक्षम पोलीस यंत्रणा असूनही त्यांच्या मारेकऱ्यांचा कसलाच सुगावा लागत नाही. ही गोष्ट लाजीरवाणी अशीच आहे. कदाचीत मारेकऱ्यांचा सुगावा लागलाही असेल, पण दबावापोटी त्यांची नावे उघड करीत नाहीत, अशीच शंका वाटू लागली आहे.- इरफान बागवान, (सातारा)सर्वसामान्य व्यक्तीची हत्या झाली की पोलीस २४ तासात पुरावा नसतानाही तपास करतात. परंतू दाभोलकरांसारख्या व्यक्तिची हत्या होवून दोन वर्ष झाली तरी मारेकरी मोकाटच आहेत. हा आघाडी व युती सरकारच्या नाकर्तेपणा आहे. मारेकऱ्यांचा लवकरात लवकर छडा लागणे गरजेचे आहे.- नितीन गुजर, (कऱ्हाड)आघाडी-युतीच्या राजकारणात रंगली ‘हत्या’ !सातारा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा राजीनामा मागणारे देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री आहेत. गृहमंत्रिपदही त्यांच्याकडे आहे. त्यांच्या काळातही तपास लागलेला नाही. तर तेव्हाचे सत्ताधारी आणि आजचे विरोधक सत्ताधाऱ्यांवर तपासाच्या दृष्टीने टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे आघाडी असो किंवा युती, यांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे राजकारणच चालविल्याचे दिसत आहे. २० आॅगस्ट २०१३ रोजी पुणे येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. आज या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली. तरीही या हत्येचा तपास लागलेला नाही. दोन वर्षांत अनेक ठिकाणी तपास झालेला आहे. तपास अंतिम टप्प्यात आला आहे, असे अनेकवेळा सांगूनही झाले आहे. पण, त्याच्या पुढे काहीही झालेले नाही. विरोधात असताना आजचे सत्ताधारी बोलत होते. तर आज विरोधात असणारे सत्तेत असताना तपास सुरू असल्याचे सांगत होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राज्यातील अनेक ठिकाणी आघाडी सरकारवर टीकेचे आसूड ओढले होते. त्यानंतर अवघ्या सव्वा वर्षातच युती सरकार सत्तेवर आले. फडणवीस यांच्याकडे आज मुख्यमंत्री व गृहमंत्रिपदही आहे. तसेच त्यांच्या कार्यकालाला आता दहा महिने होत आले तरी दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांचा शोध लागलेला नाही. 730 दिवस म्हणे ‘तपास चालूच आहे!’सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन तब्बल दोन वर्षे उलटली; परंतु अद्यापही तपास यंत्रणेला मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास यश आले नाही. याची कारणे अनेक देता येतील, त्यापैकी एक म्हणजे तपास यंत्रणेतील समन्वयाचा अभाव असल्याचे प्रकर्षाने पुढे येत आहे. दि. २० आॅगस्ट हा दिवस उजाडला की, यावर तात्पुरती चर्चा होते आणि तपास यंत्रणाही चार्ज होते. मात्र, तपास काही पुढे सरकतच नाही. त्यामुळे ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तपास यंत्रणेच्याविरोधात खदखद आहे.दि. २० आॅगस्ट २०१३ रोजी पुणे येथील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची दोन मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. पुण्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी आणि तेही पोलीस चौकीपासून काही अंतरावर ही घटना घडली असताना पोलिसांना या प्रकरणाचा कसा काय सुगावा लागला नाही. याचे आश्चर्च व्यक्त होत आहे. पुणे पोलिसांनी घटनेनंतर दहा-बारा टीम केल्या. या टीम वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केल्या; मात्र कुठल्याच टीमच्या हाती सुगावे लागले नाहीत. अखेर सहा महिन्यांनंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. यातील तपासी अधिकारी हिंदी भाषिक असल्यामुळे त्यांना मराठीतून माहिती घेण्यासाठी बराच कालावधी लागला. कागदपत्रांची माहिती समजेपर्यंत त्यांची बदलीही झाली. त्यामुळे डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा तपास अधांतरीच राहिला. सध्या ‘सीबीआय’चे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असले तरी ते मुंबईत वास्तव्याला आहेत. त्यामुळे तपासाला गती नसल्याचा आरोप डॉ. हमीद दाभोलकर यांनी केला आहे. पोलीस आणि सीबीआय यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळेच हा तपास रेंगाळत असल्याचेही बोलले जात आहे. (प्रतिनिधी)घटनेनंतर केवळ फोनवरून चौकशीडॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून झाल्यानंतर काही दिवसांतच पुणे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. घटनेनंतर पहिल्या आठवड्यात साताऱ्यातील अनेकजणांना पुण्यातून फोन आले. ज्या लोकांनी डॉ. दाभोलकरांना फोन केले होते. त्या लोकांना पोलिसांनी फोन केले होते. फोनवरून नाव, गाव अशी जुजबी माहिती विचारली जात होती. त्यानंतर काही सेकंदातच फोन ठेवला जात होता. प्रत्यक्षात बोलावून एकाचीही त्यांनी चौकशी केली नाही. दाभोलकर कुटुंबीय लढाईसाठी सज्ज डॉक्टर पत्नी शैला दाभोलकर यांची भूमिका सातारा : डॉक्टरांच्या जाण्याचे दु:ख आभाळाएवढे आहे. कोणत्याही प्रकारे भरून न येणारी ही अपरिमित हानीच म्हणावी लागेल. पण या दु:खाने सर्वांच्याच मनात पुन्हा एकदा विवेकाची लढाईची बिजे रोवली आहेत. डॉक्टरांनंतरही त्यांचे विस्तारित कुटुंब या लढाईसाठी सज्ज असणं हेच विवेकाचे यश असल्याचे मत डॉ. शैला दाभोलकर यांनी व्यक्त केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर दाभोलकर कुटुंबीयांबरोबरच अंधश्रध्दा निर्मुलन समितीही पोरकी झाली होती. मात्र, डॉक्टरांच्या जाण्यानंतरही एका विवेकी विचाराने ही संघटना यशस्वीपणे काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. समाजातील विविध प्रवाहांमधील अनेक लोकांचा सहभाग आणि संघटनेविषयीची आत्मीयता लक्षात घेता डॉक्टरांचे कार्य इथून पुढेही अविरत सुरू राहील याचे द्योतक म्हणावे लागेल. डॉ. दाभोलकर यांच्या जाण्यानंतर मला मोठं मातृत्व मिळालं, असे सांगून डॉ. शैला दाभोळकर म्हणाल्या, ‘डॉक्टरांनी कधीच स्वत:ला कुटुंबापुरते मर्यादित ठेवले नव्हते. संघटना आणि त्याचे काम करताना त्यात समाविष्ट होणारा प्रत्येक घटक हा त्यांचा कुटुंबीय होता. त्यामुळे त्यांच्या जाण्याने हानी वैयक्तिक आयुष्य आणि संघटनात्मक पातळीवरही झाली. पण डॉक्टरांचे विवेकी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही एकवटलो आहोत. हा विवेकवाद हत्येनंतर संपणार नाही, तो अधिक वाढेल, हाच संदेश आता दिला.’दु:खातून उगवलेली पेरणी खूप जोमाने आणि आत्मभानाने फळाला येते. आत्ता आमचा हा उगवणीचा काळ आहे. डॉक्टरांच्या हत्येनंतर ‘अंनिस’च्या सर्व शाखांना भेटी आणि व्याख्यानाच्या माध्यमातून मी अनेकांपर्यंत पोहोचले. प्रत्येक ठिकाणी समृध्द अनुभव आणि डॉक्टरांच्या कामाची पावती मिळत गेली. समता, बंधुता आणि संविधान मानणाऱ्या समाजाची निर्मिती करण्यासाठी अजून काही काळ लोटावा लागेल पण ते अशक्य नाही, याची प्रचिती येत असल्याचेही डॉ. शैला दाभोलकर म्हणाल्या.डॉ. शैला दाभोळकर म्हणाल्या, ‘नरेंद्रला आता आम्हाला हात लावता येणार नाही, त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारता येणार नाहीत, पण त्याने आम्हाला दिलेले विचार पुढे नेण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहणार आहोत. त्याच्या आॅडिओ आणि व्हिडिओ पाहून कोणाचेच समाधान होऊ शकत नाही. विवेक विचारांची लढाई लढताना एक आश्वासक सत्य दिसते की पुढील काही शतकं विवेक लढ्याविषयी त्याचं नाव घेतलं जाईल.’ (प्रतिनिधी) विवेक लढ्यासाठी दाभोलकर कुटुंबीयांचे प्रयत्नडॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी विवेकानंद आणि अंधश्रध्दा याविषयावर त्यांनी पुस्तिकाही प्रसिध्दी केली आहे. याबरोबरच त्यांचे पुतणे अतिश दाभोलकर यांनी एका ट्रस्टच्या मदतीने नभांगण तयार केले आहे. बालवयातच मुलांवर ग्रह, चंद्र, तारे यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार झाला तर पुढे त्यांना वैज्ञानिकतेकडे वळविणे सोपे होईल, या दृष्टीने या नभांगणाची संकल्पना पुढे आली.
कोण म्हणतं डॉक्टर गेले?..--हत्येनंतरची दोन वर्षे..730 दिवस म्हणे ‘तपास चालूच आहे!’
By admin | Published: August 19, 2015 10:13 PM