मुंबई: महिनाभर चाललेल्या सत्तासंघर्षानंतर राज्यात सरकार स्थापन झालं. दोन दिवसांपूर्वी शपथविधी झाल्यानंतर काल महाराष्ट्र विकास आघाडीनं विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. भाजपा-शिवसेनेत वाढलेला दुरावा, शिवसेनेनं एनडीएतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय, राष्ट्रपती राजवट, शिवसेनेचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी झालेला घरोबा, त्यानंतर तीन पक्षांनी केलेली सत्तास्थापना अशा अनेक अभूतपूर्व घडामोडी विधानसभा निवडणुकीत घडल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीनं काल विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. नव्या सरकारच्या स्थापनेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे शरद पवार यांनी पाच वर्षांपूर्वी काढलेले उद्गार खरे ठरले.ऑक्टोबर २०१४ मध्ये पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेना, भाजपाची युती तुटली होती. तर काँग्रेस, राष्ट्रवादीनंदेखील स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याबद्दल शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले राजकारणापलिकडील संबंध होते. बाळासाहेब असते, तर शिवसेना सध्यासारखी एकाकी पडली असती का?', असा प्रश्न विचारताच 'कोण म्हणत सेना एकाकी आहे?,' असा प्रतिप्रश्न पवारांनी केला. पवारांच्या या प्रतिप्रश्नानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या.पत्रकारांच्या प्रश्नाला पवारांनी क्षणार्धात उत्तर दिलं. पवारांच्या एका विधानाचे अनेक अर्थ निघतात. त्याची जाणीव खुद्द पवारांनाही असल्यानं दुसऱ्याच क्षणी त्यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं. ‘शिवसेना एकटी लढते आहे, तशीच राष्ट्रवादीसुद्धा एकटीच लढते आहे. तुम्ही आम्हाला एकाकी म्हणत नाही,’ असं पवार म्हणाले. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यावेळी त्यांनी सध्याच्या नेतृत्त्वांशी माझं काही जुळत नाही. जनरेशन गॅप असावी बहुधा, असा टोला लगावला होता. कोण म्हणत शिवसेना एकाकी, हे शरद पवारांचे ऑक्टोबर २०१४ मधले उद्गार यंदाच्या नोव्हेंबरमध्ये खरे ठरले. शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरुन भाजपापासून दूर गेल्यानंतर 'आम्ही विरोधी बाकांवर बसू' ही भूमिका राष्ट्रवादीनं सोडली. त्यानंतर पवार सतत शिवसेनेच्या संपर्कात होते. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास सुरुवातीला काँग्रेस फारशी उत्सुक नव्हती. मात्र काँग्रेस नेतृत्त्वाचं मन वळवण्यातही पवारांनी मोठी भूमिका बजावली. त्यानंतर झालेलं अजित पवारांचं बंडदेखील पवारांनी अतिशय चतुराईनं हाताळलं. काँग्रेस आणि शिवसेनेमधला दुवा होत त्यांनी राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आणलं. त्यामुळे ५ वर्षांपूर्वीचे त्यांचे उद्गार खरे ठरले.
...अन् शिवसेनेबद्दलचे शरद पवारांचे 'ते' शब्द पाच वर्षांनी खरे ठरले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 7:52 AM