मंत्री कोणाला करावे, हाच एक प्रश्न आहे...
By अतुल चिंचली | Updated: December 8, 2024 07:56 IST2024-12-08T07:55:39+5:302024-12-08T07:56:56+5:30
सरकार कोणत्याही पक्षाचे, विचाराचे स्थापन झाले, तरी मंत्री कोणाला करावे? हाच एक प्रश्न सतत छळत राहतो...

मंत्री कोणाला करावे, हाच एक प्रश्न आहे...
- अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई
प्रिय आमदार मित्रहो,
सरकार कोणत्याही पक्षाचे, विचाराचे स्थापन झाले, तरी मंत्री कोणाला करावे? हाच एक प्रश्न सतत छळत राहतो... एका पक्षाचे मुख्यमंत्री असलेले सरकार असो किंवा वेगवेगळ्या पक्षांचे एक मुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री किंवा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे कसेही सरकार बनले तरी प्रश्न एकच आहे, मंत्री कोणाला करावे... तुमच्या मनातल्या प्रश्नांचा घेतलेला हा वेध -
जात बघावी की समाज...
की सांभाळावे विभागाचे गणित...
की झुगारून द्यावीत सगळी बंधनं
आणि द्यावे फक्त आणि फक्त
गुणवत्तेलाच प्राधान्य?
की संधी द्यावी निष्ठावंतांना...?
त्यातही पक्षातल्या निष्ठावंतांना,
की आपल्यावर निष्ठा ठेवणाऱ्यांना..?
जिल्ह्या-जिल्ह्यात पक्ष वाढवण्यासाठी
द्यावी संधी आपल्याच पक्षातल्या नेत्यांना..?
की गांधीजींवर प्रेम असणाऱ्या
आपल्याच नेत्यांना द्यावी मंत्रिपदाची संधी..?
गांधींचे फोटो ज्याच्याजवळ जेवढे जास्त
तेवढा तो आपल्या कामाचा...
या विचारांमुळे दादा..., भाऊ..., साहेब...
तिघेही परेशान आहेत बाबूराव... म्हणून तर
कोणाला संधी द्यावी हाच एक प्रश्न आहे..?
साहेबांपुढे वेगळेच प्रश्न आहेत...
तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर
अब्दुल सत्तार यांनाच किती वेळा संधी देता...
आम्ही काय सतरंज्याच उचलायच्या का?
असा सवाल चार वेळा निवडून आलेले,
आपल्यावर निष्ठा ठेवून आपल्या सोबत आलेले,
अनेक नेते कळवळून विचारत आहेत...
त्यांना काय उत्तर द्यायचे?
या विचारात साहेब रात्रभर अस्वस्थ होते...
कारण, मंत्री कोणाला करावे..?
हाच एक सवाल आहे...
जो दिवस-रात्र सगळ्यांना छळतो आहे...
तिकडे दादांचेही असेच झाले आहे...
छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील,
धनंजय मुंडे, आदिती तटकरे यांना डावलून
शिफारस तरी कोणाच्या नावाची करायची?
मराठा तितुका मेळवावा...
अशी भूमिका घ्यायची की,
देवाभाऊसारखी ओबीसींची
जबरदस्त मोट बांधायची..?
की पदरी पडले पवित्र झाले, असे म्हणत
मिळेल ती मंत्रिपदं घ्यायची आणि
गपगुमान बसायचे पाच वर्षे विरोध न करता...
सारखा एकच प्रश्न छळतो आहे
मंत्री कोणाला करावे? हाच तो प्रश्न आहे...
देवाभाऊकडे जाऊन सांगायचे कसे..?
लॉबिंग करायचे की स्वतःचे मार्केटिंग...
देवाभाऊपुढेही प्रश्न आहेतच...
वर्षानुवर्षे मंत्रिपदाची झूल पांघरणाऱ्यांना
दूर करून, देऊन टाकावी का संधी नव्या रक्ताला?
आणि घ्यावा वसा नवनिर्माणाचा...
की, ज्येष्ठांना द्यावे पाठवून सल्लागार मंडळात,
आणि नव्यांच्या हाती द्यावी राज्याची दोरी
पक्षाचे निष्ठावंत महत्त्वाचे; की आपले...?
प्रश्न अनेक आहेत, पण छळणारा प्रश्न एकच आहे
यावेळी मंत्री करावे तरी कोणाला..?
की ठेवाव्या मंत्रिपदाच्या काही खुर्च्या रिकाम्या,
वर्षानुवर्ष हेच तर करत आले आहेत, सगळे...
त्यातली एक खुर्ची तुमच्यासाठीच ठेवली आहे,
असे सांगून घ्याव्या काढून पालिका निवडणुका
की वाटावीत मन कठोर करून
महामंडळांची गाजरे नेहमीप्रमाणे राज्यभर...
कोणी म्हणतील तुम्ही इतके कठोर का झालात..?
एका बाजूला आम्ही ज्यांना मोठे केले,
तेच आम्हाला विसरून गेले... दुसऱ्या बाजूला
आम्ही केलेली मदतही काही जण विसरून गेले...
मग अशा विस्कटलेल्या प्रश्नांचे,
हे सगळे गाठोडे घेऊन दयाघना
प्रश्न सोडवण्यासाठी जायचे तरी कोणाकडे..?
कारण या सगळ्याच्या वरही एक प्रश्न छळतोच आहे
मंत्री कोणाला करावे? हाच तो प्रश्न आहे...
- तुमचाच बाबूराव