Uday Samant : उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यातील सभेसाठी येत असताना शनिवारी (दि.१०) मुलुंड चेक नाक्याजवळ ठाकरे यांच्या गाडीवर मनसैनिकांनी शेण फेकले. त्यानंतर ठाण्यात गडकरी रंगायतन येथे जमलेल्या आक्रमक मनसैनिकांनी ठाकरे यांच्या गाडीवर बांगड्याही फेकल्या. त्यानंतर रंगायतन परिसरात मनसैनिक आणि शिवसैनिक आमने-सामने आले. यावेळी त्यांनी परस्परांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली.
दोन्हीकडील कार्यकर्त्यांना रोखताना पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतल्याने पुढील राडा टळला. मात्र, या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. यावर आता मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिला आहे. ते म्हणाले, मराठवाडा दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांच्या गाड्यावर सुपाऱ्या फेकल्या. सुरुवात कोणी केली? मला वाटतं मनसैनिकांनी प्रतिउत्तर दिले आहे.
अशी परिस्थिती कोणी निर्माण केली याचा महाराष्ट्रातील जनतेने विचार केला पाहिजे. सुरुवातीला हे घडलं नसतं तर ठाण्यामध्ये त्याची प्रतिक्रिया आली नसती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उठाव केल्यानंतर ज्या हीन दर्जाने बोलले जात आहे, ते आम्ही सहन करत आहोत. शाब्दिक हल्ले समजू शकतो, पण त्यात महाराष्ट्रातील संस्कृती असली पाहिजे. राज ठाकरे यांनी त्यांच्या संघटनेसाठी केलेला दौरा होता त्याला डिस्टर्ब करायची गरज नव्हती. तसंच, मनसैनिकांना शिवसैनिकांच्या साथीने कोणतीही कृती करावी लागेल इतके मनसैनिक दुबळे नाहीत, अशीही प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.
(ठाण्यात जे काही झालं, ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारं नाही - जितेंद्र आव्हाड)
असा झाला राडा...उद्धव ठाकरे यांच्या मोटारींच्या ताफ्याने ठाण्यात प्रवेश करताच मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्या. त्यानंतर त्यांची गाडी गडकरी रंगायतन येथे येताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी गडकरी रंगायतनच्या आवारात प्रवेश केला आणि घोषणाबाजी केली. मोटारीवर बांगड्या फेकल्या. काहींनी हातातील लोखंडी कडे फेकले. गाडीवर नारळही फेकण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने त्यामुळे कुणाला इजा झाली नाही. उद्धव यांच्या स्वागताकरिता लावलेले बॅनर व पोस्टर मनसैनिकांनी फाडले. सभेकरिता आलेल्या वाहनांच्या मनसैनिकांनी काचा फोडल्या. ठाकरेंच्या सभेकरिता जमलेले शिवसैनिक बाहेरील घटना कळताच रंगायतनच्या बाहेर आले. मनसैनिक व शिवसैनिक यांच्यात बाचाबाची, शिवीगाळ सुरू झाली. मात्र, सुरक्षेकरिता असलेल्या पोलिसांनी हातात मनसेचे झेंडे घेतलेल्या व घोषणाबाजी करणाऱ्यांना झटपट पकडून पोलिसांच्या गाड्यांत कोंबल्याने आणखी टोकाचा राडा टळला. त्यानंतर पोलिस बंदोबस्तामध्ये ठाकरे सभास्थळी दाखल झाले.
मनसेच्या ४४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखलबीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकल्याचे पडसाद शनिवारी ठाण्यात उमटले. ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये राडा घालणाऱ्या मनसेच्या ४४ कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी ठरवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी आविनाथ जाधव यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी दिली असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दोन वेगवेगळे एफआयआर दाखल केले आहेत.