मुंबई : विधानसभेतील संख्याबळानुसार आगामी राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला महाराष्ट्रातून ३ जागा येतात. त्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे नाव पक्षाकडून नक्की करण्यात आल्याची चर्चा असून, तिसºया नावाबाबत मात्र चर्चांना उधाणआले आहे. जावडेकर आणि राणे यांच्यासोबत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.राज्यसभेच्या एकूण ५८ जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. त्यातील ६ जागा महाराष्ट्रातून आहेत. विधानसभेचे संख्याबळ पाहता, ३ जागांवर भाजपाचा विजय निश्चित मानला जातो आहे. त्यामुळे या तीन जागांवर महाराष्ट्रातून भाजपा कुणाला राज्यसभेवर पाठविते, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. राणे, जावडेकर आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाची चर्चा असल्या, तरी ३ मार्च रोजी केंद्रीय निवड समितीची बैठक होणार असून, त्यात या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.दोन केंद्रीय मंत्र्यांच्या जोडीनेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना भाजपाने राज्यसभेवर पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. राणे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नवी दिल्लीत भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. त्या वेळी शहांनी त्यांना राज्यसभेची आॅफर दिल्याचे खुद्द राणे यांनी स्पष्ट केले आहे.दिल्लीतील भेटीदरम्यान, शहा यांनी आपल्याला आगामी निवडणुकीत भाजपासोबत राहणार किंवा नाही, याबाबत तुमची भूमिका काय, असा प्रश्न विचारल्याचे राणे यांनी सांगितले आहे. राज्यातील मंत्रिपदाचा निर्णय होईपर्यंत तुम्ही राज्यसभेवर जाऊ शकता, अशा शब्दांत शहा यांनी आपल्याला राज्यसभा सदस्यत्वासाठी आॅफर दिल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आपल्याला राज्यात मंत्रिपद देण्याबाबत मुख्यमंत्र्यांची सहमती आहे. त्यांनी मला तसा शब्द दिला आहे. मात्र, सध्या काही अडचणी असल्याचे त्यांनी मला सांगितले. या अडचणी आपल्याला पटल्या असून, त्यासाठी मुख्यमंत्र्यांना थोडा वेळ द्यायला हवा, असे राणे यांनी सांगितले.>प्रधान यांनाही मिळू शकते उमेदवारीप्रकाश जावडेकर हे विद्यमान केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री असून, ते सध्या मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेले आहेत. या वर्षाच्या शेवटाला मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे जावडेकर यांना गृहराज्य असणाºया महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्यात येणार आहे.याशिवाय, केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांचाही राज्यसभेचा कार्यकाळ संपत आला आहे. मुळचे ओडिसाचे असणारे प्रधान बिहारमधून राज्यसभेवर गेले होते. मात्र, बिहार विधानसभेतील भाजपाचे सध्याचे संख्याबळ तोळामासा असल्याने, त्यांनाही महाराष्ट्रातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
भाजपाचा तिसरा उमेदवार कोण?, राजकीय चर्चांना उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 5:46 AM