ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - दोन-तीन दिवसांपूर्वी भाजपाचे राज्यसभेतील खासदार एल.ए. गणेशन यांनी मांडलेल्या मुद्द्यामुळे अंदमान-निकोबार द्वीपसमुहातील एक बेट चर्चेत आले आहे. १८५७ साली झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या विरोधात लढणा-या ब्रिटीश लष्करी अधिकारी हेन्री हॅवलॉकचे नाव या बेटाला असू नये, हे नाव लवकरात लवकर बदलण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. साहजिकच याबाबत एक नवी चर्चा सुरू झाली आहे. हॅवलॉक यांचे नाव काढले तर या बेटास कोणत्या नावाने ओळखले जावे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेन्री हॅवलॉक यांचा जन्म इंग्लंडमध्ये बिशपवेअरमाऊथ येथे ५ एप्रिल १७९५ रोजी झाला. १८२२ साली त्यांचा ब्रिटीश लष्कराच्या १३ व्या रेजिमेंटमध्ये प्रवेश झाला आणि त्यांना सेवेसाठी भारतामध्ये पाठवण्यात आले. भारतात येण्यापूर्वी त्यांनी पर्शियन आणि हिंदी भाषा शिकून घेतल्या होत्या. १८२४ साली झालेल्या पहिल्या अँग्लो बर्मिज युद्धामध्ये त्यांनी कामगिरी बजावली, हे युद्ध दोन वर्षे चालले.
त्यानंतर ते इंग्लंडला परत गेले आणि हॅना शेफर्ड मार्शमॅनशी विवाह केला. १८३९ साली त्यांची नेमणूक अँग्लो अफगाण युद्धासाठी करण्यात आली काबूलवर ताबा मिळवण्यासाठी इंग्रज फौजांनी केलेल्या कामगिरीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. यापुढे त्यांच्यावर सर्वात महत्त्वाची कामगिरी सोपवण्यात आली ती म्हणजे १८५७ साली बंडाळी करणा-या शिपाई आणि संस्तानिकांविरोधात लढण्याची. या बंडामध्ये हॅवलॉकनी कानपूरचा पाडाव करण्यात यश मिळवले. त्यामुळे त्यांना हिरो ऑफ कानपूर असेही म्हटले जाते. मात्र याच धामधुमीत २४ नोव्हेंबर रोजी आजारपणामुळे हॅवलॉक यांचे निधन झाले.
लंडनमध्ये ट्रफाल्गर स्क्वेअर येथे आणि सुंदरलँड येथील मॉब्रे येथे त्यांचे पुतळेही उभारण्यात आले, त्याचप्रमाणे अंदमानमधील एका बेटाला त्यांचे नाव देण्यात आले. लखनौमध्ये हॅवलॉकच्या थडग्यावर स्तंभही उभारण्यात आला आहे.
हॅवलॉक बेटाबद्दल...
हॅवलॉक बेट हे अंदमान निकोबार द्वीपसमुहातील एखाद्या पाचूच्या रत्नाप्रमाणे सुंदर आहे. हिरवीगार भूमी, प्रवाळ खडक, सभोवती स्वच्छ निळे पाणी यामुळे पर्यटकांची या बेटाला नेहमीच सर्वाधीक पसंती असते. या बेटाचे क्षेत्रफळ ११३ चौकिमी असून पोर्ट ब्लेअर पासून ते ३९ किमी अंतरावर आहे. या बेटावर विमानतळही असून बेटावरचे निवासी मुख्यत्वे बंगाली आहेत. या बेटावरील राधानगर किनाºयास आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनारा असा सन्मानही मिळाला आहे.