कोण ठरणार अपात्र? विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी, एकत्रित सुनावणीसाठी शिवसेना शिंदे व ठाकरे गटाकडून रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 08:17 AM2023-09-14T08:17:43+5:302023-09-14T08:18:19+5:30
Rahul Narvekar: सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेबाबत दिलेल्या निर्णयानंतर तब्बल पाच महिन्यांनी विधानसभेतील सेंट्रल हॉलमध्ये शिवसेना ठाकरे व शिंदे गटाच्या आमदारांवर एकत्रितरित्या उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे.
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेबाबत दिलेल्या निर्णयानंतर तब्बल पाच महिन्यांनी विधानसभेतील सेंट्रल हॉलमध्ये शिवसेना ठाकरे व शिंदे गटाच्या आमदारांवर एकत्रितरित्या उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीला सामोरे जायचे नियोजन दोन्ही गटांकडून करण्यात आले असून या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदारांच्या पात्र-अपात्रतेसंदर्भातील सुनावणी उद्यापासून सुरू होणार आहे. या सुनावणीसाठी ठाकरे गटाकडून रणनीती ठरविण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व आमदारांनी वकीलपत्र अध्यक्षांकडे सादर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत आणि वकील असीम सरोदे यांच्यामार्फत वकीलपत्र ठाकरे गटाकडून सादर करण्यात आले आहे. हे वकील सुनावणी दरम्यान ठाकरे गटाच्या आमदारांची बाजू मांडण्याची शक्यता आहे. याआधी अध्यक्षांनी दिलेल्या नोटिशीला ठाकरे गटाच्या आमदारांनी वकिलांमार्फत वैयक्तिकरित्या ५०० पानी लेखी उत्तर दाखल केले होते. अगदी तशाच प्रकारे सुनावणी दरम्यान ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी वकीलपत्रात आपले लेखी म्हणणे अध्यक्षांकडे सादर केले आहे.
शिंदे गटाकडून ६००० पानांचे उत्तर
- त्याचप्रमाणे शिंदे गटाकडून ६००० पानी खुलासा सादर करण्यात
आले आहे. या लेखी उत्तराबरोबरच उद्या काही पुरावेही शिंदे गटाकडून सादर केले जाणार आहेत.
- आपलाच पक्ष हा अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा युक्तिवाद पुन्हा
एकदा शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांसमोर केला जाणार आहे.
दोन वकील मांडणार ठाकरे गटाकडून बाजू
सुनावणीआधी सकाळी ११ वाजता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात ठाकरे गटाच्या आमदारांची एक बैठक होईल आणि त्यानंतर १२ वाजता ठाकरे गटाचे सर्व आमदार आणि वकील सुनावणीसाठी उपस्थित राहतील.
सुनावणीदरम्यान ठाकरे गटाकडून त्यांचे दोन वकीलच आमदारांची बाजू अध्यक्षांसमोर मांडतील. अध्यक्षांकडून वैयक्तिकरित्या आमदारांना सुनावणी दरम्यान आपले म्हणणे मांडण्यास विचारले गेल्यास आमदार आपली भूमिका मांडतील.