विधानसभा अध्यक्षांच्या निकालात कोण अपात्र?; शिंदे-ठाकरेंच्या या ३० आमदारांचीही धाकधूक वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 09:31 AM2024-01-10T09:31:00+5:302024-01-10T09:34:18+5:30
दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अंतिम निकाल देणार आहेत.
Shivsena MLA Disqualification ( Marathi News ) : शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अंतिम निकाल देणार आहेत. या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कारण या निकालाचा दूरगामी परिणाम देशाच्या राजकारणावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष नक्की कोणत्या गटाला अपात्र करणार की अन्य काही निकाल देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत आपल्या समर्थक आमदारांसह आधी सुरत आणि नंतर गुवाहाटी गाठल्यानंतर ठाकरेंच्या पक्षाने शिंदे आणि समर्थक आमदारांना अपात्र करण्याची याचिका दाखल केली होती. त्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटातील आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली. यासंदर्भातील विविध तब्बल ३४ याचिकांवर मागील काही महिन्यांत झालेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या कालमर्यादेनुसार आज विधानसभा अध्यक्षांना आपला निकाल जाहीर करावा लागणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या गटातील कोणत्या १४ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?
- अजय चौधरी
- भास्कर जाधव
- रमेश कोरगावंकर
- प्रकाश फातर्फेकर
- कैलास पाटील
- संजय पोतनीस
- रवींद्र वायकर
- राजन साळवी
- वैभव नाईक
- नितीन देशमुख
- सुनिल राऊत
- सुनिल प्रभू
- उदयसिंह राजपूत
- राहुल पाटील
शिवसेना शिंदे गटातील कोणत्या १६ आमदारांचा समावेश?
- एकनाथ शिंदे
- भरत गोगावले
- संजय शिरसाठ
- लता सोनवणे
- प्रकाश सुर्वे
- बालाजी किणीकर
- बालाजी कल्याणकर
- अनिल बाबर
- चिमणराव पाटील
- अब्दुल सत्तार
- तानाजी सावंत
- यामिनी जाधव
- संदीपान भुमरे
- संजय रायमूळकर
- रमेश बोरनारे
- महेश शिंदे
अपात्रतेसाठी दाखल ३६ याचिकांची ६ टप्प्यांत विभागणी
१. सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेची केलेली मागणी
२. सुनील प्रभू यांनी तीन अपक्ष आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेल्या याचिका
३. सुनील प्रभू यांनी योगेश कदम यांच्यासह शिंदे गटातील १८ आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेल्या याचिका
४. सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या व्हिपचा भंग केल्याबद्दल एकनाथ शिंदेंसह ३९ आमदारांच्या अपात्रतेची याचिका
५. सुनील प्रभू यांनी विश्वासदर्शक ठरावाबाबतच्या व्हिपचा भंग केल्याबद्दल एकनाथ शिंदेंसह ३९ आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेल्या याचिका
६. व्हिपचे उल्लंघन केल्याबद्दल ठाकरे गटाच्या १४ आमदारांच्या अपात्रतेची मागणी करणारी भरत गोगावले यांची याचिका