Sharad Pawar : कोल्हापूर : सध्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या पक्षात आता नेत्यांचे इनकमिंग सुरू झाले आहे. कालच कालगमध्ये भाजपच्या समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? यावरुन चर्चा सुरु आहेत. यातच शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. बुधवारी (दि.४) सकाळी कोल्हापूरमध्ये शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी मुख्यमंत्री ठरवण्याचा फॉर्म्युला कसा असणार आहे, याबद्दलचे संकेत दिले आहेत.
शरद पवार म्हणाले, "मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत आताच आग्रह धरण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्रीपदाबाबतीत महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. आकड्यांच्या आधारावर विधानसभा निवडणुकीननंतर महाविकास आघाडीचा कोण होणार हे ठरणार आहे. मुख्यमंत्री कोण? हे आता महत्त्वाच नाही. सध्या महाविकास आघाडीला बहुमत मिळेल अशी स्थिती आहे. तसे वातावरण राज्यात आहे. तसेच, लोकांच्या पाठिंब्यानंतर एक स्थिर सरकार देणं महत्त्वाचं आहे. स्थिर सरकार देणं, हे आमचे उद्दिष्ट्य आहे", असे म्हणत संख्याबळ आल्यानंतर नेतृत्व कुणी करायचे, याचा निर्णय होईल असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.
याचबरोबर, शरद पवार यांनी याबाबत बोलताना १९७७ चे उदाहरणही दिले. "आणीबाणीनंतर देशात निवडणूका झाल्या. या निवडणुकीत जयप्रकाश नारायण यांनी सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. तेव्हा सर्व एकत्र आले, त्यावेळी कोणताही चेहरा निवडणुकीत नव्हता. निवडणुकीनंतर मुरारजी देसाई यांचे नाव पंतप्रधानपदासाठी आले. तोपर्यंत त्यांचे नाव कुठंही आले नव्हते. तो निर्णय निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर जाहीर करण्यात आला होता", असे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. तसेच, महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा केली जावी, अशी मागणी केली जात आहे. उद्धव ठाकरे सुद्धा मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. याबाबत संजय राऊत अनेक वेळा भाष्य केले आहे. तर काँग्रेसकडूनही नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, आता शरद पवारांनी जे काही असेल ते निवडणुकीनंतर होईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.