पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? नाना पटोलेंचं सूचक विधान, राष्ट्रवादी, ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 03:04 PM2023-05-01T15:04:06+5:302023-05-01T15:04:38+5:30
Nana Patole: राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्रिपदाबाबत वेगवेगळी विधानं होत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक सूचक विधान केलं आहे.
गेल्या काही काळामध्ये राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन होईल, अशी आशा महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या मनात निर्माण झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्रिपदाबाबत वेगवेगळी विधानं होत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक सूचक विधान केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षांची डोकेदुखी वाढू शकते. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय जनताच करेल. ज्या पक्षाला जनता आशिर्वाद देईल त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू असली तरी त्यावर आता भाष्य कण्याची गरज वाटत नाही. जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, ते प्रश्न हाती घेऊन काँग्रेस जनतेला न्याय देण्यासाठी लढत आहे. सध्या निवडणुका नाहीत त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, जे लोक त्यावर चर्चा करत असतील तर त्यांना करु दया. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय जनताच करेल. ज्या पक्षाला जनता आशिर्वाद देईल त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
दरम्यान, राज्यात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षच नंबर एकचा पक्ष म्हणून विजयी झालेला आहे. जनतेचा विश्वास काँग्रेस पक्षावर आणखी दृढ झालेला आहे. भारतीय जनता पक्ष शेतकरी विरोधी असल्याने बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांचा धुव्वा उडाला आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
यावेळी राज्याच्या विकासावरून नाना पटोलेंनी भाजपावर जोरदार टीका केली. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर देशात पहिल्या नंबरचे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्यात काँग्रेस सरकारचेच मोठे योगदान आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत काँग्रेसच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी राज्याला प्रगतीपथावर आणून ठेवले. परंतु मागील काही वर्षांपासून दिल्लीच्या आदेशावरून भाजपा सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहे. ही अधोगती थांबवून पुन्हा एकदा महाराष्ट्राला देशात अव्वल स्थानी आणण्याचा संकल्प महाराष्ट्रदिनी करुयात, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.