राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक झाल्यानंतर या दोन जागांवर कोण लढणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपाचे नेते पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले यांची लोकसभेवर निवड झाल्याने या दोन जागा रिक्त झालेल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांवर भाजपा आपले उमेदवार देणार की त्यापैकी एक जागा मित्रपक्षाला देणार, याबाबत सध्या वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.
आज साताऱ्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यसभेच्या दोन जागा आमच्याकडे आहेत. त्यातील एक जागा ही भाजपाकडे राहणार आहे. तर एक जागा आम्ही अजित पवार यांना देणार असल्याचं मान्य केलं होतं. त्यानुसार ती जागा ही त्यांच्या पक्षाला दिली जाऊ शकते किंवा जाणार आहे. जो काही योग्य निर्णय असेल तो आमचं संसदीय मंडळ घेईल, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्यांमध्ये रिक्त असलेल्या राज्यसभेच्या १२ जागांसाठी येत्या ३ सप्टेंबर रोजी निवडणुका होणार आहे. तसेच त्याच दिवशी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. यात महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या दोन जागांचा समावेश आहे. सातारच्या बदल्यात उदयनराजे भोसले यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेची जागा आम्हाला मिळणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच म्हटले होते. त्यानुसार भाजप आता राज्यसभेची एक जागा त्यांना देणार का? याबाबत राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता होती. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलेल्या संकेतांमुळे राज्यसभेची एक जागा भाजपा अजित पवार गटाला सोडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.