मुंबई : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशावरुन दोन्ही पक्षांत चर्चेला ऊत आलेला असताना त्यांच्यासोबत किती आमदार येणार याची आधी खात्री करा, अशी अट भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी घातल्यामुळे राणेंचा पक्षप्रवेश बिकट बनला आहे. जे आमदार राणेंसोबत जातील, त्यांना सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. अन्यथा पक्षांतरबंदी कायद्यामुळे आमदारकी जाईल, असा त्याग कोण करणार? हाही प्रश्न आहेच.अमित शहा शनिवारी भोपाळमध्ये होते. त्यांनी तेथून महाराष्टÑातील भाजपाच्या नेत्याला फोन केला आणि राणेंसोबत किती आमदार येतील, याची खात्री करा. मग पुढे ठरवू, असे सांगितले. तो निरोप राणेंना पोहोचवला गेला. त्यामुळे आमदारकीवर पाणी सोडून दोन अडीच वर्षांसाठी निवडणुकीला पुन्हा सामोरे जायची हिंमत किती जण दाखवतील, याची चाचपणी सुरू आहे.राणे काँग्रेसमध्ये नेते आहेत, त्यांच्याविरुद्ध बोलण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नमती भूमिका घेतली. पक्षांतरबंदी कायद्यान्वये आमदारकी जात असल्यानेच अशोक चव्हाण यांनी ‘कारवाईचा प्रश्नच येत नाही’, अशी भूमिका घेतली आहे. शिवाय पक्षाचा एक आमदार कमी झाला, तरी विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडून जाऊ शकते. ते गमावण्याची काँग्रेसची इच्छा नाही.राणेंसोबत नितेश राणे व कालिदास कोळंबकर यांची नावे चर्चेत आहेत पण कोळंबकर यांना राणेंचा शिक्का लावून भाजपात जायचे नाही, असे त्यांच्या जवळचे लोक सांगतात. जे कोणी पक्ष सोडून भाजपात जातील, त्यांच्याविरुद्ध पोटनिवडणुकीत मतभेद विसरून एकच उमेदवार देण्याची भूमिका काँग्रेस, राष्टÑवादी व शिवसेना यांनी घेतली आहे. पृथ्वीराज चव्हाण व अजित पवार यांचे यावर एकमत आहे.काँग्रेस नेत्याच्या म्हणण्यानुसार, भाजपाच्या दारात राणेंसारखा माजी मुख्यमंत्री उभा आहे आणि तीन महिने भाजपा दार उघडत नाही हे अपमानास्पद आहे. मी कोणताही निर्णय घेतला नाही, असे राणे म्हणतात. पण काँग्रेस सोडणार नाही असे सांगतही नाहीत. त्यांनीच स्वत:भोवती संशय निर्माण केल्याचे, हा नेता म्हणाला.कदाचित राणे यांना आपल्या विरुद्धच्या चौकशा नको असाव्यात, असा चिमटाही त्याने काढला. अन्य पक्षातून भाजपामध्ये येणाºयांना मंत्री करत असाल तर मग आम्ही सतरंज्याच उचलायच्या का?, असा सूर भाजपामध्ये निघत आहे. पक्षाची स्थिती चांगली असताना एका नेत्यासाठी वर्षानुवर्षे काम करणाºयांची नाराजी घ्यायची का?, अशी चर्चा भाजपाच्या गोटात आहे.राणे म्हणतात...मी शनिवारी सिंधुदुर्गात असताना, दिल्लीला गेल्याच्या बातम्या आल्या. आज मी दिवसभर आॅफिसात असताना बैठका घेत आहे, अशा बातम्या येत आहेत. ज्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांना बोलावणार असे सांगितले जाते. त्याचे कामच पूर्ण झालेले नाही. त्याला महिना लागेल. त्यानंतर उद्घाटनाची तारीख ठरेल. मी कोणाला बोललो नाही, भेटलो नाही तरीही तुम्हीच बातम्या चालवत आहात, असे राणे म्हणाले.
आमदारकी सोडून नारायण राणेंसोबत भाजपात जाणार कोण?
By अतुल कुलकर्णी | Published: August 20, 2017 12:16 AM