मुंबई - हे सरकार आणि त्यातील मंत्री, राज्यपाल सगळ्यांमध्ये शिवरायांचा आणि महाराष्ट्राचा अपमान करण्याची स्पर्धा लागलीय. त्यात मंगलप्रभात लोढा यांची भर पडलीय. ही स्पर्धा तुम्ही करत असाल तर महाराष्ट्राची आणि देशाची जनता डोळे बंद करून बसली नाही. सगळं काही पाहत आहे. लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना करारा जवाब मिलेगा अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी इशारा दिला आहे.
संजय राऊत म्हणाले की, मंगलप्रभात लोढा महाराष्ट्राचे मंत्री, पर्यटन मंत्री आहेत. निदान त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती असायला हवा. पर्यटक शिवाजी महाराजांनी केलेले गडकिल्ले पाहायला येतात. त्यावेळी छत्रपतींच्या आग्रा दौऱ्याची तुलना एका पक्षाशी, राज्याशी गद्दारी करणाऱ्यांसोबत करताय. याचा अर्थ तुम्ही छत्रपतींनाच बेईमान ठरवण्याचा प्रयत्न करताय असा आरोप त्यांनी केला.
तसेच भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी माफीवीर ठरवलं. आता पुन्हा एका मंत्र्याने छत्रपतींचा अपमान केला. मूळात या खोके सरकारने छत्रपतींचा अपमान करण्याची स्पर्धा लावलीय का? त्याला दिल्लीनं बक्षीस ठेवलंय का? कौन करेगा छत्रपतींचा अपमान? ही स्पर्धा लावल्यासारखे दिसतंय. जो उठतो तो रोज छत्रपतींचा अपमान करतायेत. जे स्वाभिमान, हिंदुत्व या मुद्द्यावर सोडून गेले मग छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान, हिंदुत्वाचा अपमान नाही का? छत्रपतींच्या आग्राहून सुटकेची तुलना बेईमानाच्या बंडखोरीशी करत असाल तर त्याला लवकर उत्तर मिळेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
हे सगळे खोटे बोलतायेतराज्यपालांचे विधान चुकीचं असले तरी ते पद संवैधानिक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. त्यावर संजय राऊतांनी पलटवार करत दिल्लीत जाऊन बसा, पंतप्रधानांच्या दारात ठाण मांडून बसा, गृहमंत्री अमित शाह यांना मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवावं. कॅबिनेटने राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्याचा ठराव मांडावा हे तुमच्या हातात आहे असं सांगत हे सगळे खोटे आहेत असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"