नागपूर - समाज एका स्थित्यंतरातून चालला आहे. विकसिनशील देशाकडून विकसित देशाकडे जाणारी आपली वाटचाल आहे. त्यात माध्यमांची भूमिका सकारात्मक असली पाहिजे का? देशाच्या दृष्टीने निश्चित असली पाहिजे. या नॅरेटिव्हच्या वॉरमध्ये नुकसान कोणाचं होणार आहे? आधीच्या काळात नक्षलवाद्यांना पाठबळ बाहेरून मिळाले. २००८ पर्यंत ८ लाख कोटींचे प्रस्ताव आले ते सुरू होऊ शकले नाहीत. त्यातून कुणाचा फायदा झाला हा प्रश्न माध्यमांचं धुव्रीकरण झालंय असं म्हणणाऱ्यांकडून घेतलं पाहिजे असं मत राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी मांडले.
नागपूर येथील लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये राहुल पांडे म्हणाले की, समाज किर्तनानं सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही ही आपल्याकडे म्हण आहे. माध्यमांचे धुव्रीकरण आपण बोलतोय पण समाजाचं धुव्रीकरण झाले असेल तर त्याचे प्रतिबिंब माध्यमांमध्ये दिसते. माध्यमे हा समाजाचा आरसा आहेत. बोटचेपी धोरण, गोलमेज भाषा वापरायची का हा प्रश्न आहे. भारतीय पत्रकारिता अतिशय उज्ज्वल आहे. या देशाचा स्वातंत्र्य लढा माध्यमांनीही लढला आहे. त्याही काळात इंग्रजांची तळी उचलणारे माध्यमे होती. ज्यांनी इंग्रजांचे राज्य दैवी वरदान आहे असं म्हटलं होतं. १९४७ ते आज आपण स्वातंत्र्याचं ७५ वं अमृत महोत्सव साजरा करतोय. या कालावधीत माध्यमात धुव्रीकरण राहणारच आहेत. समाजात राजकीय, आर्थिक, सामाजिक या विषयांवर वेगवेगळे विचार असणार आहेत. विचारांची लढाई हा लोकशाहीचा सर्वात मोठा कणा आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत पत्रकारांना दोन्ही बाजूने वाजवणारे लोकं आहेत. १९७५ च्या काळात माध्यमांनी ठरवून बातमी छापणे आणि न छापणे हे सहज शक्य होते. आज तुम्ही कुठलीही बातमी लपवू शकत नाही. माझी पहिली बातमी छापायला २८ दिवस लागले परंतु आज २८ मिनिटेही बातमी रोखू शकत नाही. माध्यमांचा वेग वाढला आहे. मीडिया म्हटलं की फक्त टेलिव्हिजन, पारंपारिक वृत्तपत्र नाही तर त्याच्या पलीकडे डिजिटल मीडिया आहे. ज्याचा रिच खूप जास्त आहे. त्यात तुम्हाला समर्थन करणारे आणि विरोध करणारे तितक्याच मोठ्या संख्येने असतात. इतकेच नाही तर तुम्ही ज्या विचारांना सर्च कराल त्याच बातम्या तुमच्यासमोर येत असतात. हा प्रकार डेटा कंपन्यांनी नॅरेटिव्ह सेट केलेला प्रकार आहे त्याने भारतीय समाज खरेच विभाजित झालंय का? अशी चिंता माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, २०१४ नंतर देशात फारच परिस्थिती बदलली किंवा फारच परिस्थिती ढासळली आहे असा गैरसमज पसरवला जातो. आजही माध्यमांमधून जे प्रश्न लोकांचे उपस्थित केले जातात त्याला दुसरा तरी कुठला पर्याय नाही. आज माध्यम म्हटलं तर ज्याच्यावर समाजाचा, कायद्याचा अंकुश आहे आणि ज्याच्यावर कुणाचाही अंकुश नाही अशांकडे पाहतो. समाजात असलेली दुही ही समाजमाध्यमांमध्ये दिसते तेव्हा तुमचा विचार त्यात दिसतो. त्यामुळे धुव्रीकरण माध्यम करतंय का तसे विचार करणारे व्यक्ती करतायेत? माध्यमांचे धुव्रीकरण झालंय असं म्हणणाऱ्यांनी गेल्या ८-१० वर्षात समाजहिताच्या कुठले मुद्दे दुर्लक्षित केलेत? याचे उदाहरण देण्यात अपयशी ठरतात. विरोधी पक्षाने मुद्दे उचलले की तर ते पुढे नेण्याचं काम माध्यमांचे आहे. माध्यमे कुठे कमी पडली हे न सांगता माध्यमांचे धुव्रीकरण चाललंय आणि एकांगी बातमी दिल्या जातायेत असं म्हटलं जाते. देश म्हणजे मोदी नाही. हा देश मोदींच्या आधी होता आणि नंतरही राहणार आहे. देशाच्या विविध भागांमधल्या आज गडचिरोलीतील दुर्मिळ भागात मागील ८०-१०० वर्षात त्यांच्याकडे न पोहचलेला विकास त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. माध्यमांचा व्यक्तींच्या जीवनावर प्रभावही राहिला नाही हे सत्य आहे असंही राहुल पांडे यांनी स्पष्टपणे सांगितले.