विठ्ठल खेळगी -
सोलापूर : राज्यातील राजकीय पेच पाहता आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार, याबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सन २०१८ साली मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे देवेंद्र फडणवीस यांची संधी हुकली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संधी मिळाली. कोरोना काळात ठाकरे यांनी स्वत: मुंबईपासून पंढरपूरपर्यंत आठ तास ड्रायव्हिंग करीत पूजेला उपस्थिती लावली. यंदाही पूजेला ठाकरेच स्टेअरिंग हातामध्ये घेणार की देवेंद्रांना हुकलेली संधी पुन्हा मिळणार, याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा एक-दोन अपवाद वगळता अखंडपणे सुरू आहे. आतापर्यंत १८ मुख्यमंत्र्यांना महापूजा करण्याची संधी मिळालेली आहे. यंदा आषाढी एकादशी १० जुलैला आहे. आषाढीच्या तोंडावर राज्यात राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे. तत्पूर्वीच मागील आठवड्यात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात आली आणि पूजेचे निमंत्रणही देण्यात आले आहे. त्यानंतर आता दिवसागणिक राज्यातील राजकीय वातावरण बदलत आहे. सरकार स्थिर राहिल्यास पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना महापूजेची संधी मिळणार आहे. तत्पूर्वीच जर नवीन सरकार येऊन मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यास त्यांना २०१८ साली हुकलेली संधी मिळणार आहे.
दोन वेळा महापूजेला विरोधआतापर्यंत दोन वेळा महापूजेला विरोध झालेला आहे. १९७१ साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना महापूजा करता आली. तेव्हा समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी पूजाअर्चा करणे योग्य नाही म्हणून जनआंदोलन छेडले होते. २०१८ मध्येही मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांना विरोध झाला होता.स्वागताला मामा की बापू?पालख्यांच्या स्वागताला पालकमंत्री हजेरी लावतात. यंदा पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे उपस्थित राहणार की शहाजीबापूंना संधी मिळाणार याची उत्कंठा लागली आहे.
आतापर्यंत १८ मुख्यमंत्र्यांना महापूजेची संधीयशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, ए. आर. अंतुले, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव निलंगेकर, मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे.