- धर्मराज हल्लाळेयुती होगी तो ठीक, नही तो पटक देंगे. हे विधान म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा आत्मविश्वास की अहंकार? ज्या तऱ्हेने नियोजन अन् राजकीय सोहळ्यांचे आयोजन सुरू आहे त्यावरून भाजपाचा हा आत्मविश्वास आहे असे समजू़ सत्ता आहे, संघटन आहे आणि सोबतीला धनाची जोड आहे. चार वर्षात भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावर एकापाठोपाठ एक राज्ये हस्तगत केली. परंतू, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाने तीन राज्य गमावली. तिथल्या पराभवाची कारणमिमांसा पक्षाने केली अन् २०१९ ची लढाई अधिक ताकदीने लढण्यासाठी बुथ कार्यकर्ता, शक्तीकेंद्र प्रमुख यांच्याशी थेट पंतप्रधान मोदी, अध्यक्ष शहा यांनी संवाद सुरू केला. पंतप्रधानांनी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आंध्र प्रदेशच्या कार्यकर्त्यांशी तर शहा यांनी लातुरात येऊन चार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद केला. इतकेच नव्हे शहा यांचा मराठवाड्यात मुक्काम झाला. ज्या चार लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी शहा बोलले त्यातील एकमेव लातूर जिल्ह्यात भाजपा खासदार आहे. पैकी नांदेड, हिंगोली आणि उस्मानाबाद या तिन्ही मतदारसंघात शिवसेनेचा भाजपाच्या बरोबरीने प्रभाव आहे. किंबहूना उस्मानाबाद आणि नांदेडमध्ये शिवसेना सरस आहे. नेमके त्याच ठिकाणी येऊन शहा यांनी शिवसेनेला इशारा दिला. त्या इशाºयाचे शब्दही भाजपा नव्हे शिवसेना स्टाईलचे होते. सेनेच्याच भाषेत सेनेला पटकावण्याची जणू धमकीच दिली. उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे बोट धरून भाजपा वाढली आहे. नांदेडमध्येही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे भाजपाच्या तुलनेने शिवसेनेचा अधिक प्रभाव असलेल्या भागात येऊन शहांनी सेनाशाही पटकावण्याची भाषा केली. स्वाभाविकच शिवसेनेतून तिखट प्रतिक्रिया येणे क्रमप्राप्त होते. प्रादेशिक पक्षांना बाजुला करण्याचे धोरण भाजपा आखत आहे, हेच सूत्र शहांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. नुकत्याच झालेल्या राज्यांच्या निवडणूक प्रचारातही भाजपाने टोकाची भाषणे केली. पंतप्रधान मोदी बघून घेतो म्हणाले आणि आता शहा पटक देंगे म्हणू लागले आहेत. प्रादेशिक पक्षांना सोबत आले तर घ्यायचे नाही आले तर त्यांनाही आस्मान दाखवायचे असा इरादा भाजपाचा आहे. आता महाराष्ट्रात शिवसेनेला आणि देशात कोण कोणाला पटकावणार हे दोन महिन्यात कळणारच आहे.जिथे मित्र पक्षांना हा शाब्दिक दणका आहे तिथे विरोधकांसाठी कोणती भाषा वापरायची याला निर्बंध कसले? १८ वर्षांची मुलगी आणि २१ वर्षाचा मुलगा यांचा विवाह योग्य हे कायदा सांगतो. सर्व विरोधक एक एक वर्षांचे मिळून २१ जण आहेत, आणि म्हणत आहेत हा झाला मुलगा २१ वर्षाचा. महाआघाडीवर केलेली ही टिपण्णी राष्ट्रीय अध्यक्ष शहांच्या तोंडची आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. निवडक नागरिकांशी संवाद साधला परंतू हा सर्व खटाटोप एकतर्फी होता. तसेही भाजपात प्रश्नोत्तर करण्याची पद्धत नाही. मोदींनी मुलाखत दिली. अध्यक्षांनी भाषण ठोकले. लोकांची मते समजून घ्यायची नाहीत, नेत्यांची मते मात्र लोकांच्या गळी उतरवायची. जितके चांगले तेवढे आम्ही केले जे काही बिघडलेले आहे ते ७० वर्षात असा सगळा सूर आहे. मात्र या खेपेला शहांनी ७० ऐवजी ५५ वर्षात वाटोळे झाले अशी दुरूस्ती केली. म्हणजेच मधला काही काळ अटल बिहारी वाजपेयी आणि इतर सरकारांचा होता हे त्यांना कळले आहे. पंतप्रधान आवास योजनेचा उल्लेख केला.२०२२ पर्यंत सर्वांना घरे देणार असे सांगितले. गॅस कुणी दिला, शौचालय कुणी दिले हे जनतेपर्यंत न्या, असे फर्मावले. परंतू गॅस कसा महागला याचे उत्तर कोण देणार? कार्यकर्त्यांना समजावून सांगतानाही लोकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे राष्ट्रीय अध्यक्षांकडूनही मिळाली नाहीत. प्रत्येक वर्षीच्या दोन कोटी रोजगाराचे काय झाले? नोटाबंदीचे फलीत काय यावर एक शब्दही उच्चारला नाही. राफेलवर गदारोळ असल्यामुळे त्यामध्ये एक पैशाचा घोटाळा नाही हे सांगून शहा मोकळे झाले.महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांचे काम जोरात सुरू आहे. मात्र राज्य रस्त्यांचे काय हा सवालच आहे. मराठवाड्यातील एकूण एक राज्य रस्ते खड्डेमय आहेत. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषणे होती. हमी भावाची आश्वासने होती. मात्र सर्व काही हवेतच आहे. दुष्काळामुळे मराठवाडा होरपळत आहे. खरीप पिकले नाही, रबी पेरले नाही जिथे काही पिकले तिथले विकले जात नाही. विकले तर भाव मिळत नाही.राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांचा ज्या चार मतदारसंघासाठी दौरा झाला, तिथे शेतकरी चिंतीत आहेत त्यांना आश्वस्त करणारे शब्द अपेक्षित होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकºयांनी कांदा रस्त्यावर फेकला आहे. हमी भाव केंद्र बंद झाली होती. शेतकºयांमधील संतापाला उत्तर देणे हे सरकारसमोरचे मोठे आव्हान आहे. प्रत्येक घरात गॅस पोहोचविण्याचे ठिक आहे परंतू, गॅस विकत घेण्याची कुवत कोठून येईल. प्रश्न पोटापाण्याचे, रोजगाराचे आहेत. तिथे गॅस आणि शौचालयाची मलमपट्टी कितपत टिकेल.