पुणे : ‘प्रख्यात शास्त्रीय गायक मुकुल शिवपुत्र यांना दिवसाढवळ्या लुटले जाणे, एकापाठोपाठ एक अशा सलग वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडणे, दिवसागणिक होत असलेले निर्घृण खून आणि त्यातून शहरात पसरत चाललेली दहशत रोखणार कोण?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या महिनाभरात झालेल्या घटना पाहता, पोलिसांचा दरारा आणि अस्तित्वच जाणवत नसल्याचे चित्र आहे. नुसताच ‘स्मार्ट’ पोलिसिंगचा नारा देऊन कायदा-सुव्यवस्था स्मार्ट होणार का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. एकंदरीत, शहराच्या रस्त्यांवर दहशतीचे वातावरण पसरत चाललेले असताना पोलीस मात्र गायब आहेत.वाकड परिसरात टोळक्याने धुमाकूळ घालून २० ते २५ वाहनांची तोडफोड केली. ही घटना घडते न घडते, तोच खडकी बाजार परिसरात १० ते १५ जणांच्या टोळक्याने चाळीसपेक्षा अधिक वाहने फोडली होती. वारज्यातही अशाच प्रकारे तोडफोडीचे प्रकार घडलेले आहेत. तर, गेल्याच आठवड्यात अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने बिबवेवाडीमध्ये वाहनांची तोडफोड केली. या सर्व घटनांमध्ये नुकसान मात्र सर्वसामान्य नागरिकांचे होत आहे. सर्वसामान्यांना दाद मागायला जागाच शिल्लक राहिलेली नाही. दहशत माजविण्यासाठी टोळक्यांचे हात पोलीस असताना धजावतातच कसे, असा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसांत पोलीस आयुक्तालयामध्ये निर्माण झालेले अस्थिर वातावरण याला काही प्रमाणात कारणीभूत आहे. अनेक अधिकारी सध्या कोणतेही काम करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. अतिवरिष्ठांच्या कारवाईच्या भीतीचा निरीक्षकांपासून थेट उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच धसका घेतला आहे. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या कडक स्वभावामुळे अनेक अधिकारी त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधायला घाबरत आहेत. तर, सहआयुक्त सुनील रामानंद यांच्या नियमावर बोट ठेवून होणाऱ्या कारवाईमुळे अनेक अधिकारी ‘एक्झिक्युटीव्ह’ पोस्टिंग नको रे बाबा, असे म्हणत आहेत. गेल्याच आठवड्यात आयुक्तालयामध्ये झालेल्या परिमंडल २ आणि परिमंडल ४ च्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत थेट पोलीस आयुक्त आणि एक उपायुक्त असा कलगीतुरा रंगला होता. यासोबतच एका महिला सहायक आयुक्तांवर राग व्यक्त करीत असताना या सहायक आयुक्तांनी पोलीस आयुक्तांना आपण कसे व्यवस्थित काम करतो आहोत, हे ठणकावून सांगितले होते. पोलीस दलातील अस्थिर वातावरण निवळल्याशिवाय कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे अवघड जाणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तसेच गणेशोत्सव, ईदच्या पार्श्वभूमीवर अशा घटना वाढण्याची शक्यता आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास पोलिसांना परिस्थिती हाताळणे कठीण होऊन बसेल. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांना कारवाईची भीतीलग्नाची पत्रिका द्यायला गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला अत्यंत वाईट पद्धतीने एका अतिवरिष्ठाने बाहेर काढले होते. काही उपायुक्तांची तर माध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच ‘अक्कल’ काढण्यात आली होती. बदल्यांच्या काळापासूनच शहर पोलीस दलातील अस्थिर वातावरणाला सुरुवात झाली आहे. मुदतपूर्व बदल्यांमुळे अन्याय झाल्याच्या भावनेमधून मॅटमध्ये काही अधिकारी गेले. त्यांच्या बाजूने मॅट कोर्टाने आदेश देऊनही त्याला केराची टोपली दाखविण्यात आली. या अधिकाऱ्यांना ‘अस्तित्वात’ नसलेल्या पदांवर नेमण्यात आले. त्याउलट शहरात बेकायदा धंद्यांवरच्या कारवाईच्या नावाखाली ‘लूट’ चालविलेल्या काही अधिकाऱ्यांना अतिवरिष्ठांनी जवळ केले होते. त्यांची साधी चौकशीही अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईची भीती वाटू लागली आहे.केवळ पुणे पोलीस आयुक्तालयच नाही, तर पोलीस दलाच्या अन्य विभागांमधल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्येही याबाबत मोठी चर्चा आहे. पोलीस कर्मचारीही सध्या काम करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. पोलीस कर्मचाऱ्यासारखा पोलीस दलातील सर्वांत शेवटचा घटकही थेट आयुक्तांविरोधात मॅटमध्ये गेला आणि तेथून ‘स्टे’ घेऊन आला. या सर्व अस्थिर वातावरणाचा परिणाम शहरातील पोलिसांच्या कामावर दिसू लागला आहे. ‘मला काय करायचे आहे?’ अशी विधाने आता पोलिसही करू लागले आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरटे, घरफोड्या करणारे सक्रिय झाले आहेत. गेल्या २ महिन्यांत तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता घरफोड्यांमध्ये चोरीला गेली आहे. यांतील एकही घरफोडी अद्याप पोलिसांना उघडकीस आणता आलेली नाही. कोथरूडमध्ये सलग ८, अलंकार आणि डेक्कनला एकाच दिवसात १४, कोरेगाव पार्क, लष्कर, समर्थ पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये लाखोंच्या घरफोड्या घडत असतानाही पोलीस मात्र डोळ्यांवर कातडी ओढून बसलेले आहेत. गेल्या काही दिवसांत एकामागोमाग एक निर्घृण खून होत आहेत. वारज्यातील बलभीम भरम यांचा खून, २५ दिवसांच्या बाळंतिणीचा अपहरण आणि खून, चिंचवडला तरुणाचा दगडाने ठेचून झालेला खून ही त्याची काही ठळक उदाहरणे आहेत. वाहनांच्या तोडफोडीला लगाम लावण्यात तर पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत.
पुण्यातील ‘दहशत’ रोखणार कोण?
By admin | Published: June 25, 2016 12:48 AM