निवडणूक आयोग राष्ट्रवादी कोणाला देणार? आज सुनावणी; निकालाचीही प्रतिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 08:38 AM2023-11-09T08:38:55+5:302023-11-09T08:39:20+5:30
शिवसेनेच्या वादावेळी आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही शिंदे गटाला दिले आहे. यानंतर ठाकरे गटाने दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभेत सुनावणी सुरु आहे.
गेल्या सव्वा वर्षापासून राज्यात कधी नव्हे तेवढे राजकीय वाद सुरु आहेत. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड करत शिवसेना आपल्या ताब्यात घेतली. त्याच वाटेवर पाऊल ठेवत अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केले आहे. शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे, परंतू राष्ट्रवादी कोणाची यावर अद्याप निर्णय आलेला नाहीय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरु आहे. आज यावर सुनावणी होणार आहे. दोन्ही गटांनी आपापली बाजू भक्कम असल्याचे सांगत आयोगाकडे कागदपत्रे, पुरावे जमा केले आहेत. शरद पवार गटाने ८-९ हजार प्रतिज्ञापत्रे जमा केली आहेत. ही अजित पवार गटापेक्षा जास्त असल्याचेही त्यांच्याकडून सांगितले जात आहे.
या दोन्ही गटाच्या काही याचिका सर्वोच्च न्यायालयात, काही विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहेत. तर निवडणूक आयोगामध्ये पक्ष आणि पक्ष चिन्ह यावरून सुनावणी सुरु आहे. यावर आज आयोग निकाल देणार की पुन्हा पुढील तारीख देणार हे समजणार आहे. गेल्याच महिन्यात दोन्ही बाजुच्या गटांची सुनावणी झाली आहे.
शिवसेनेच्या वादावेळी आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही शिंदे गटाला दिले आहे. यानंतर ठाकरे गटाने दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभेत सुनावणी सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष विलंब लावत असल्याचा आरोपांवर सर्वोच्च न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट करत ३१ डिसेंबरपर्यंत निकाल देण्याचे आदेश अध्यक्षांना दिले आहेत. त्यानंतर महिन्याने पवार गटाची याचिका निकाली लावण्यासही सांगितले आहे. यामुळे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन महिने महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ घडविणारे ठरणार आहेत. यातच लोकसभा निवडणुकही लागणार आहे.