- बाळकृष्ण परबसतराव्या लोकसभेसाठी कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात काल कमालीच्या शांततेत मतदान पार पडले. महाराष्ट्राच्या राजकारणात संवेदनशील भाग म्हणून या मतदारसंघाची ओळख असल्याने या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. मात्र यावेळी काही अपवाद वगळता येथील निवडणूक शांततेत झाली. गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही येथे नारायण राणे विरुद्ध शिवसेना असाच सामना येथे रंगला. नाही म्हणायला काँग्रेसचा उमेदवारही येथे रिंगणात होता. मात्र त्याची उपस्थिती प्रत्यक्ष लढतीपेक्षा इव्हीएमवर नाव येण्यापुरतीच राहिली. मात्र गेल्यावेळी 1 लाख 50 हजार मतांनी विजयी होणाऱ्या शिवसेनेच्या विनायक राऊत यांना नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी कडवी टक्कर दिल्याने यावेळी इथे अटीतटीची लढत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळासह कोकणी माणसांमध्ये सुरू आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा भाग माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा शिवसेनेत असतानापासूनचा बालेकिल्ला. मात्र 2014च्या लोकसभा आणि त्याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत तो सर केला. त्यामुळे हातातून निसटलेला हा गड पुन्हा सर करायचाच या ईर्षेने नारायण राणे आणि त्यांचा पक्ष या निवडणुकीत लढला. त्यामुळेच नरेंद्र मोदींचा चेहरा आणि केंद्रात व राज्यात सत्तेवर असूनही शिवसेना-भाजपाची या मतदारसंघात राणेंचे आव्हान मोडून काढताना दमछाक होताना दिसली.खरंतर कार्यकर्त्यांचे बलाबल पाहता शिवसेना आणि स्वाभिमान हे या मतदार संघात समसमान पातळीवर होते. त्यातही विद्यमान खासदारांसह लोकसभा मतदारसंघातील एकूण सहापैकी पाच आमदार दिमतीला असल्याने शिवसेनेचे पारडे कमालीचे जड होते. पण राणेच्या आक्रमक प्रचारासमोर ही मंडळी बॅकफूटवर गेल्याचे दिसत होते. विशेषत: सध्याच्या निवडणुकांमध्ये निर्णायक ठरणाऱ्या सोशल मीडियाच्या वापरामध्येही राणे समर्थकांची सोशल मीडिया टीम शिवसेनेपेक्षा अनेक पटींनी आघाडीवर दिसली.मात्र या मतदारसंघाचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे स्पष्टपणे पडणारे दोन भाग शिवसेनेच्या पथ्यावर पडल्याचा अंदाज मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्यक्त होत आहे. एकंदरीत कल पाहता सिंधुदुर्गात शिवसेना आणि स्वाभिमानमध्ये अटीतटीची लढत झाल्याची चर्चा आहे. त्यात स्वाभिमानच्या निलेश राणे यांनी आघाडी घेतल्याचाही दावा केला जात आहे. तर रत्नागिरीमध्ये असलेल्या वर्चस्वाच्या जोरावर विनायक राऊत यांनी रत्नागिरीतील तिन्ही विधानसभा मतदारसंघात मुसंडी मारल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी झालेल्या मतदानामध्ये सिंधुदुर्गातील कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण आदी भागात स्वाभिमानचा जोर दिसून आला. तर शिवसेनेच्या वैभव नाईक यांचे वर्चस्व असलेल्या कुडाळ आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी-वेंगुर्ला मतदारसंघातही स्वाभिमानने धनुष्यबाणाला घाम फोडल्याचे बोलले जात आहे. मात्र या भागात धनुष्यबाणही अचूक चालल्याचा दावा केला जात आहे. एकंदरीत तोडीस तोड झालेल्या या लढतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाभिमान आघाडीवर राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. या मतदारसंघाचा वरचा भाग असलेल्या रत्नागिरीत मात्र धनुष्यबाणाने आपले वर्चस्व राखल्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्गाच्या तुलनेत रत्नागिरीमध्ये स्वाभिमानची ताकद तितकीशी नाही, ही बाब शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांच्या पथ्यावर पडल्याची चर्चा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी आणि संगमेश्वर-चिपळूण आदी भागांमध्ये शिवसेनेने आपली ताकद कायम राखली आहे. नाणार प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा झाल्याने शिवसेनेला होणाऱ्या विरोधाची धारही बोथट झाली. त्यातच मतदानापूर्वी स्वाभिमानचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत डेरेदाखल झाल्याने स्वाभिमानच्या अडचणी वाढल्या. त्यामुळे या भागातील तिन्ही मतदारसंघात शिवसेनेने 2014 च्या आसपास जाणारी आघाडी घेतल्याची चर्चा आहे. त्याशिवाय ठरावीक मतदारांकडून काँग्रेस उमेदवाराला झालेल्या मतदानाचा फटकाही गेल्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेल्या निलेश राणे यांना बसल्याचे सांगितले जात आहे. जर काँग्रेसचा उमेदवार लढतीत नसता आणि राणे विरुद्ध राऊत अशी थेट लढत झाली असती तर विनायक राऊत यांना ही निवडणूक अजूनच जड झाली असती, अशी शक्यताही अनेक कार्यकर्ते खासगीत व्यक्त करत आहेत. तसेच राऊतांवर नाराज असलेल्या भाजपातील काही कार्यकर्त्यांची मते स्वाभिमानकडे वळल्याचेही कानावर येत आहे. एकंदरीत चित्र पाहता शिवसेना आणि स्वाभिमानच्या थेट लढतीत काँग्रेसच्या उमेदवाराने ठरावीक मते आपल्या बाजूला वळवून लढतीत रंगत आणली आहे. त्यातही रत्नागिरी शिवसेनेच्या बाजूने तर सिंधुदुर्ग राणेंच्या बाजूने उभा राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या 23 मे रोजी मतमोजणीवेळी विनायक राऊत आणि निलेश राणेंमध्ये अटीतटीची लढत दिसून येणार आहे. मात्र मतदारांनी नेमका काय कल दिला आहे ते समजण्यासाठी 23 मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा!!!
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ: धनुष्यबाण की स्वाभिमान?; राऊतांना अॅडव्हाटेंज की राणे काढणार विकेट?
By बाळकृष्ण परब | Published: April 24, 2019 3:33 PM