लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. मंगळवार १७ नोव्हेंबर ही अर्ज वापस घेण्याची अखेरची तारीख आहे. त्यामुळे मंगळवारी कोण कोण उमेदवार आपला अर्ज वापस घेतात, याकडे संपूर्ण पदवीधर मतदारसंघ वर्तुळ व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
एकूण ३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केला. पाच उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरल्याने २६ उमेदवार शर्यतीत आहेत. आता यातील प्रत्यक्ष किती उमेदवार रिंगणात राहतात, हे मंगळवारी सायंकाळीच स्पष्ट होऊ शकेल. काही अपक्ष उमेदवार मंगळवारी माघार घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काँग्रेसचे अभिजित वंजारी, भाजपचे संदीप जोशी यांच्यासह लोकभारतीचे किशोर वरंभे, रिपा(खो.)चे राजेंद्र चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे राहुल वानखेडे, मानवाधिकार पक्षाच्या अॅड. सुनिता पाटील व विदर्भवादी संघटनांचे नितीन रोंघे हे प्रमुख उमेदवार आहेत.