Chhagan Bhujbal : (Marathi News) नाशिक : देवेंद्र फडणवीस यांनी आपला घात केल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आहे, हा प्रयोग संभाजीनगरवरून होणार होता. महिला कार्यकर्त्यांच्या आडून, एवढ्या खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्याचे काम नाही, तुम्हाला हे शोभत नाही, असे म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोण कशाला जरांगेंचा घात करेल? त्याचं नाटक सगळ्या महाराष्ट्राला आणि संपूर्ण मराठा समाजाला लक्षात आलं आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ म्हणाले की, "काय त्या मनोज जरांगेंचं घेऊन बसलात? कोण कशाला जरांगेंचा घात करतील. एका क्षणी हॉस्पिटलमध्ये असतो मग तो तिकडे आंतरवली सराटीला जातो. नंतर परत म्हणतो की माझ्या छातीत दुखू लागलं. परत चालला हॉस्पिटलला. त्याचं नाटक सगळ्या महाराष्ट्राला आणि संपूर्ण मराठा समाजाला लक्षात आलं आहे. आपण सगळं केलं मराठा समाजाला आरक्षण दिलं. नवी नोकरभरती आहे, त्यात मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचे जीआर निघाले आहेत. सगळं करुनही मनोज जरांगे ऐकत नसतील तर काय बोलणार? हे मारुतीचं शेपूट आहे, ते वाढणार आहे. प्रसिद्धीची नशा चढते आणि ती कधीच प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना ती अधिक चढते", असे म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे.
याचबरोबर, शनिवारी भाजपाकडून लोकसभेचा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यावरही छगन भुजबळ यांनी भाष्य केले. छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्राची यादी तयार नसेल. परंतु, महाराष्ट्रात काम करणारा उमेदवार कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात 48 खासदार आहेत. त्यांची चाचपणी करून उमेदवार ठरतील. अजित पवार गटाने 10 जागा मगितल्याचा पुनरुच्चार यावेळी छगन भुजबळ यांनी केला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद दौऱ्यास आजपासून सुरुवात झाली आहे. अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील वानगाव या ठिकाणी दाखल झाले. यावेळी मराठा समाज बांधवांना जरांगे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आहे, हा प्रयोग संभाजीनगरवरून होणार होता. महिला कार्यकर्त्यांच्या आडून, एवढ्या खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्याचं काम नाही, तुम्हाला हे शोभत नाही. फडणवीस यांनी पोरांवरती खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यात मराठा द्वेष ठासून भरलेला आहे. त्यांच्या सांगण्याबरून बॅनर बोर्ड काढले जात आहेत. पोलीस बोर्ड काढत आहेत, बोर्ड का काढलेत, त्यात गोळ्या घाला लिहिले आहे का, असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी विचारला आहे.