मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. या आपत्तीवेळी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले. माणसांसोबत मुक्या प्राण्यांनाही वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून गाईच्या वासराला पाठीवर घेऊन पुरातून बाहेर काढणाऱ्या तरुणाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा तरुण कोकणातील सिंधुदुर्गातील एका गावातील असल्याचाही दावा करण्यात येतोय. मात्र लोकमतने याबाबतची अधिक पडताळणी केली असता वेगळीच माहिती समोर आली आहे. पुराच्या पाण्यात गाईच्या छोट्या वासराला पाठीवर घेऊन जाणाऱ्या तरुणाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. अनेकांनी या तरुणाने दाखवलेल्या भूतदयेबाबत त्याला बक्षीसही देऊ केले आहे. मात्र लोकमतने केलेल्या पडताळणीमध्ये हा फोटो कोकणातील नसल्याचे तसेच तो तरुणही सिंधुदुर्गातील कुठल्या गावातील नसल्याचे समोर आले आहे.
या छायाचित्राबाबत आम्ही गुगलवर अधिक सर्च केला असता हे छायाचित्र काही दिवसांपूर्वी आसाममध्ये आलेल्या पुरावेळी तसेच बिहारमधील पुरावेळी मोठ्या प्रणामात व्हायरल झाल्याचे दिसून आले. त्यानंतर अधिक माहिती घेतली असता हे छायाचित्र आसाम किंवा बिहारमधीलही नसल्याचे उघड झाले. या छायाचित्राची पडताळणी करताना आम्हाला इंडिया टुडे या संकेतस्थळाने काही दिवसांपूर्वी दाखवलेली बातमी मिळाली. या बातमीमध्ये हे छायाचित्र भारतातील नसून बांगलादेशमधील असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर ढाका टाइम्स या बांगलादेशी वृत्तपत्रामध्ये 19 जुलै 2019 रोजी हे छायाचित्र प्रकाशित झाल्याचेसमोर आले. त्यामुळे हे छायाचित्र कोकण, बिहार किंवा आसाममधील नव्हे तर बांगलादेशमधील असल्याचे सिद्ध झाले.