मुंबई : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोणाला पाठिंबा जाहीर करणार याबाबत उत्सुकता आहे. ही निवडणूक १८ जुलै रोजी होत असल्याने लवकरच ठाकरे निर्णय घेतील, असे म्हटले जाते. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, असे पत्र शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे यांना दिले आहे. दुसरीकडे शरद पवार हे यूपीए व विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे एकीकडे स्वपक्षीय खासदाराच्या भावना आणि दुसरीकडे शरद पवार अशा परिस्थितीत ठाकरे कोणाला कौल देतात हे महत्त्वाचे असेल.
शिंदे-भाजप सरकारकडे १६६ आमदारांचे बळ आहे. या शिवाय राज्यात भाजपचे २३ खासदार आहेत आणि अपक्ष नवनीत राणा यांचा पाठिंबा भाजपलाच असेल. त्यामुळे मुर्मू यांना राज्यातून भरघोस मतदान अपेक्षित आहे. सेनेचे १८ खासदार आहेत. तसेच ठाकरे गटात १५ आमदार आहेत.
शिंदे, फडणवीस आजपासून दिल्लीत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारपासून दोन दिवस दिल्लीला जात आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. या भेटीत ते रखडलेले प्रकल्प, मंत्रिमंडळ विस्तार, मंत्रिपद वाटपाचा फॉर्म्युला याबाबत चर्चा करतील. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे पुण्याला जातील. तिथून ते आषाढीच्या महापूजेसाठी पंढरपूरला जातील.
कोणाला किती मंत्रिपदे, खाती दिली जातील याबाबत शिंदे-फडणवीस यांच्यात चर्चा झाली आहे. दिल्ली भेटीत त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे सूत्रांनी सांगितले.