ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित राज ठाकरेची फेसबूकवर अधिकृतरित्या एन्ट्री झाली आहे. काल रात्री अमित यांनी ' राज ' यांचे त्याने काढलेले चित्र आणि एक फेसबूक पोस्ट टाकत आपल्या अकाऊंटचा शुभारंभ केला. विशेष म्हणजे यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य याच्यानंतर आता अमितच्या रुपाने ठाकरे घराण्याच्या तिस-या पिढीचा नवा प्रतिनिधी सक्रिय राजकारणात उतरताना दिसेल अशीही चर्चा सुरू आहे.
अमित यांच्या पेजला अवघ्या काही तासांतच २५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अमित ठाकरे यांनी फेसबुक सुरु करत राजकारणातच एंट्री केली असल्याचे बोलले जात आहे. ' गेले काही महिने मी माझ्या बाबांबरोबर खूप फिरत होतो. त्यावेळी मला माझ्या विचारसरणीचे खूप लोकं भेटत होते. त्यांना त्यांचे विचार माझ्यासमोर मांडायचे होते तसेच 'अमित ठाकरे' म्हणून माझे विचार समजून घ्यायला ते उत्सुक होते. पण इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या लोकांशी संवाद साधायला खूप वेळ लागणार. त्यामुळे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला Facebook page चा पर्याय वापरतोय' अशी पोस्टही अमितने टाकली आहे.