मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज भूकंप पहायला मिळालेला आहे. आज अचानक पहाटे राष्ट्रपती राजवट उठवून राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या घडामोडींमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून शरद पवारांनाही धक्का बसला आहे.
यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज दुपारी 12.30 वाजता संयुक्त पत्रकारपरिषद घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. याला पक्षाचा पाठिंबा नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांना सायंकाळी 4.30 वाजता बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.
अजित पवार यांना बहुमतासाठी 39 आमदार लागणार आहेत. भाजपाकडे काही अपक्ष आहेत. हा आकडा 36 वर येऊ शकतो. यामुळे राष्ट्रवादीचे किती आमदार अजितदादांसोबत जातात याकडे लक्ष लागून राहिलेले असताना राष्ट्रवादीचे कळवा मुंब्र्यातील नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ते कोणासोबत आहेत हे ट्विट करून स्पष्ट केले आहे. भाजपाच्या या धक्कादायक पावलामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सतर्क झाले असून सर्वांनी मोठी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेने त्यांच्या नेत्यांना आमदार असलेल्या हॉटेलमध्ये पाठविले आहे. तर काँग्रेसही आमदारांचा कानोसा घेतला आहे.
मी मरेपर्य़ंत शरद पवार साहेबांसोबत असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी मी शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांचा असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.