मुख्यमंत्री पद राहिले बाजूला, आता चर्चा सरकार कुणाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 04:39 PM2019-11-12T16:39:04+5:302019-11-12T16:40:33+5:30
मुख्यमंत्री कुणाचा होणार अशी चर्चा गेल्या दोन आठवड्यापासून सुरु होती.
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १८ दिवस उलटले तरीही राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार स्थापन होऊ शकले नाही. भाजपला १०५ तर शिवसेनाला ५६ जागांवर विजय मिळाल्याने पुन्हा युतीचेचं सरकार येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे होते, तर भाजप ते देण्यासाठी तयर नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री कुणाचा ही चर्चा गेल्या काही दिवस पाहायला मिळत होती. मात्र आता राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडी पाहता, सरकार कुणाची होणार अशी चर्चा सुरु आहे.
विधानसभा निवडणुकीत युतीला मिळालेल्या बहुमतामुळे पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार येणार असल्याचे निश्चित समजले जात होते. मात्र सत्तेत ५०-५० च्या फॉर्म्युलानुसारच सत्तास्थापना होईल व मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार ह्या अटीवर सेना अडून बसली होती. तर दुसरीकडे भाजपकडून सुद्धा मुख्यमंत्री आमचाच होणार असे दावा केला जात होता. त्यामुळे मुख्यमंत्री कुणाचा होणार अशी चर्चा गेल्या दोन आठवड्यापासून सुरु होती.
त्यातच भाजपने माघार घेतल्याने राज्यपाल यांनी शिवसेनेला सत्तेस्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. मात्र शिवसेना सुद्धा दिलेल्या वेळात इतर पक्षाचा पाठींबा असल्याचे पत्र सादर करू न शकल्याने,राज्यपालांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिले आहे. मात्र शिवसेनच्या पाठींब्याशिवाय राष्ट्रवादी सुद्धा सत्तास्थापना करू शकत नाही.
तर शिवसेना मुख्यमंत्री पदावर अजूनही अडलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेसचे वरिष्ठ नेते याला तयार होतील का ? अशी चर्चा आहे. त्यांनतरचं सत्तास्थापनेचा तिढा सुटणार आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवडे राज्यात मुख्यमंत्री कुणाचा होणार याची चर्चा सुरु असताना आता सरकार कुणाचे येणार अशी चर्चा पाहायला मिळत आहे.