हास्य ही अशी गोष्ट आही की जी माणसाला जगातील इतर जीवजंतूंपासून वेगळी करते. एरवी आपण दुसऱ्यांवर हसण्यात अधिक आनंद घेत असतो. परंतु काही लोक असेही असतात की जे इतरांच्या चुका मोठ्या कौशल्याने दाखवितात आणि मग ज्याची थट्टा वा विनोद करण्यात आला आहे, त्या व्यक्तीच्या ओठावरदेखील हास्य उमलल्याशिवाय राहत नाही. याच कलेचे नाव आहे कार्टुनिंग, जी कधीही कुणाविरुद्ध असभ्य टिप्पणी करीत नाही. उलट तिच्यातील उणिवा अथवा दोष जगासमोर अतिशय सौजन्याने मांडतो. ही लेखणी, पेन्सिल किंवा ब्रशने रेखाटलेली अशी कला आहे की ज्यात अनेकदा शब्दांची आवश्यकता भासते तर अनेकदा केवळ व्यंगचित्रच सर्वकाही सांगून जाते. सामान्यपणे व्यंगचित्र हे समाज, राजकारण, संस्कृती आणि धर्माचा वर्तमानातील आरसा दाखविते, तर अनेकदा ते अजरामर होते आणि येणाऱ्या पिढीसाठी ऐतिहासिक दस्तऐवज बनते.पहिले राजकीय व्यंगचित्र हे अन्यायातूनच प्रसविले असावे असे मानले जाते. हुकूमशहाच नाही तर लोकशाही सरकारांनाही घाम फुटावा, एवढी प्रचंड ताकद या राजकीय व्यंगचित्रांमध्ये आहे. सामाजिक मुद्दे आणि दररोजच्या जीवनाशी संबंधित व्यंगचित्रे ही अनेक समस्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या लोकांना सकाळी-सकाळी फिक्या चहामध्ये थोडासा अतिरिक्त साखरेचा गोडवा मिळवून देते. सकाळी चेहऱ्यावर हास्य फुलविणारे हे व्यंगचित्र आज आमच्या जीवनाचा एक भाग बनले आहे. २४ तास चालणारी लुटालूट, हिंसाचार, सासू-सुनेच्या कटकारस्थानावर आधारित टीव्ही मालिका आणि राजकीय बडबडीदरम्यान आता टीव्ही वृत्तवाहिन्यांवरही व्यंगचित्र आणि एनिमेशनचे हास्यरंग दिसू लागले आहेत.
ज्याच्यावर विनोद केला, त्यालाही हसू यावे...!
By admin | Published: May 04, 2016 9:31 PM