नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यात राज्यात घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे मोठी राजकीय उलथापालथ घडून आली आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला पायउतार करत राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला कोर्टकचेरी आणि मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार यामुळे या सरकारलाही स्थिरस्थावर होता आलेलं नाही. त्यातच शिंदे गटानं शिवसेनेवर केलेला दावा यामुळे शिवसेना कुणाची, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, इंडिया टीवीच्या ओपिनियन पोलमधून खरी शिवसेना कुणाची याबाबतचा कल मतदारांनी नोंदवला आहे.
इंडिया टीव्हीच्या ओपिनियन पोलमध्ये ४६ टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असं म्हटलं आहे. तर ४४ टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गट हीच खरी शिवसेना असल्याचा कौल दिला आहे.
दरम्यान, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती असेल, असं विचारलं असता या ओपिनियन पोलमध्ये ३८.४ टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली. तर ११.३ टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला पसंती दिली. ९.२ टक्के लोकांनी शरद पवार यांच्याबाजूने कौल दिली. तर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना ८.६ टक्के लोकांनी पसंती दिली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ ८.१ टक्के लोकांनी पसंती दर्शवली.
या सर्व्हेमध्ये राज्यातील ५४ टक्के मतदारांनी २०२४ मध्ये भाजपा आणि शिंदे गटाचं सरकार सत्तेत यावं असा कल नोंदवला. तर ३२ टक्के लोकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने आपलं मत दिलं.
सर्व्हेमधील आकडेवारीनुसार आज निवडणुका झाल्यास भाजपाला ३४.१, राष्ट्रवादीला १९.६, काँग्रेसला १६,१ शिंदे गटाला १२.६ आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला ९.१ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाला १३४, राष्ट्रवादी काँग्रेसला ४४, शिंदे गटाला ४१ आणि काँग्रेसला ३८ आणि इतरांना १३ जागा मिळू शकतात.