- यदु जोशीमुंबई : राज्यात मंगळवारी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात १४ जागांसाठी सरासरी ६२.८८ मतदान झाले. औरंगाबाद, अहमदनगर, बारामती, माढा, सांगली आणि सातारा या सहा ठिकाणी २०१४च्या तुलनेत मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा वा तोट्याचा यावरून वेगवेगळे राजकीय अंदाज बांधणे सुरू झाले आहे.औरंगाबादमध्ये काँग्रेसचे सुभाष झांबड, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यात जोरदार चौरंगी लढत झाली. त्यामुळे येथे मतदानाचा टक्का वाढलेला दिसतो. बारामतीत २.७१ टक्के मतदान वाढल्याने दोन्ही बाजूंनी मतदारांचा उत्साह गेल्या वेळेपेक्षा अधिक होता हे स्पष्ट होते. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांचन कुल यांच्यात तेथे अटीतटीची लढत दिसते. साताऱ्यात उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) विरुद्ध नरेंद्र पाटील (शिवसेना) या औत्सुक्यपूर्ण लढतीने मतदानाचा टक्का ३.५८ ने वाढविला. सांगलीत संजयकाका पाटील (भाजप), विशाल पाटील (स्वाभिमानी) यांच्यातील थेट लढतीत वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पाडळकर यांचेही आव्हान होते. या चुरशीमुळे मतदान वाढले असे मानले जात आहे. माढात राष्ट्रवादीचे संजय शिंदे, भाजपचे रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातील संघर्षपूर्ण लढतीचे प्रतिबिंब मतदानातही उमटल्याचे दिसते. तेथेही मतदान वाढले. रायगडमध्ये दुहेरी लढत असूनही मतदान कमी झाले.अहमदनगरमध्ये भाजपचे डॉ. सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्यात जोरदार लढत असल्याचे वाढलेल्या टक्केवारीवरून दिसते. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शिवसेना, स्वाभिमान पक्ष व काँग्रेस अशी तिहेरी लढत असतानाही मतदान ३.८७ टक्क्यांनी कमी झाले. जळगाव, रावेर, जालना, पुणे, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर व हातकणंगलेमध्ये मतदानाचा टक्का घसरला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी विरुद्ध शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यात काटे की टक्कर असलेल्या हातकणंगलेमध्ये मतदानाचा टक्का गेल्या वेळपेक्षा २.७२ ने घसरला असला तरी ७०.७० टक्के मतदान प्रचंड चुरस दाखविते. कोल्हापुरात २.७२ टक्क्याने मतदान कमी झाले खरे, पण तिथेही सत्तरी गाठली गेली. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात घमासान लढाई आहे.भाजपकडून सातत्याने एक्झिट पोलआतापर्यंत झालेल्या तिन्ही टप्प्यांतील लढतींत नेमका कल कोणाकडे होता हे जाणून घेण्यासाठी भाजपच्या राज्यातील नेतृत्वाकडून सातत्याने नामवंत संस्थांकडून एक्झिट पोल करवून घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. मतदानाचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई आहे; पण राजकीय पक्ष वा प्रसारमाध्यमे असा एक्झिट पोल त्यांच्या आकलनासाठी घेतात. भाजपने देशातील एका नामवंत कंपनीला हे काम दिले आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे आणि सत्तेत असल्यानंतर विशिष्ट यंत्रणांकडून अहवाल घेता येतात. तसे ते सातत्याने घेण्याचे कामदेखील सुरू आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
वाढलेला ‘टक्का’ कोणाचा? राज्यात ६२.८८% मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 6:19 AM