पुणे: शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात वाद सुरू आहे. या प्रकरणावर आज सुनावणी होणार होती, मात्र ती 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आता या वादावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू(Bachchu Kadu) यांची प्रतिक्रिया आली आहे. सुप्रीम कोर्टात निकाल शिंदे गटाच्या बाजूनेच लागणार, असा विश्वास आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
आज पुण्यात माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी शिंदे गटाची बाजू लावून धरली. धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी शिंदे गटाकडून केली जात आहे. यावर धनुष्यबाण गोठवल्यानंतर अधिक संभ्रम निर्माण होईल, असे ते म्हणाले. तसेच, मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा लोकांची कामे महत्त्वाची आहेत. मंत्रिमंडळ विस्तार लांबला तरी चालेल, अशी प्रतिक्रियाही बच्चू कडू यांनी यावेळी दिली आहे.
दसरा मेळाव्यावरुन सध्या राजकारण तापले आहे. यावेळी बच्चू कडू यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही भाष्य केले. ज्याची शिवसेना त्याचा दसरा मेळावा होणार, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, एकनाथ शिंदे साहेबांची ही सेना आहे, म्हणून शिंदे यांचाच दसरा मेळावा होणार, असा विश्वासही व्यक्त केला.