मुंबई : लोकमत ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कारासाठी इन्फ्रास्ट्रक्चर या विभागात डी. एस. कुलकर्णी, राजेश पाटील, अभिषेक लोढा, सतीश मगर आणि राहुल नहार यांची नामांकने जाहीर झाली आहेत. बांधकाम क्षेत्रातील मंडळींकडे अनेकदा संशयाने पाहिले जाते. पण त्यात अनेक चांगली मंडळी असतात आणि ती अतिशय कल्पकतेने ग्राहकांचे हित जपण्यासाठी प्रयत्न करीत असतात. त्याचबरोबर रोजगार निर्मितीमध्येही त्यांचे मोठे योगदान असते.
यंदाच्या तिसऱ्या पर्वातही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयनांना प्रगतीपथावर नेणाऱ्यांमधून लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर चे मानकरी ठरविण्याची प्रक्रिया लोकमतच्या संपादकीय चमूने केलेले मंथन, राज्यभरातील कोटय़वधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून साकारत आहे. या प्राथमिक निवडीतून अंतिम विजेते निवडण्याचा मान आहे तुमचा!
लोकमतच्या संपादकीय मंडळाने त्यामुळेच अशा मंडळींची नामांकनासाठी निवड केली असून, त्यांची माहिती पुढीलप्रमाणे : डी.एस. डेव्हलपर्स लि. - डी.एस. कुलकर्णी, संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकघराला घरपण देणारी माणसं... अशी भावनिक साद घालत, हजारो लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारे महाराष्ट्रातील एक अस्सल मराठमोळे बांधकाम व्यावसायिक. पुण्यातून आपल्या व्यवसायाची भक्कम मुहूर्तमेढ रोवणाऱ्या डीएसके यांनी कालौघात मुंबई आणि देशाच्या काही प्रमुख शहरांतून विस्तार केला. आकर्षक पद्धतीने केलेली घरांची रचना, सुटसुटीतपणा, आकर्षक योजनांद्वारे घरांची विक्री ही डीएसके यांची ओळख. १९८१ सालापासून बांधकाम व्यवसायात स्वत:च्या शैलीचा ठसा उमटविणाऱ्या डीएसके यांनी २० सप्टेंबर १९९१ रोजी कंपनीची नोंदणी पब्लिक लि. कंपनी म्हणून केली. मुंबई व पुण्यात आणि परदेशात काही नामांकित प्रकल्प त्यांनी साकारले आहेत. मुंबई शहरातील ज्या मोजक्या गगनचुंबी इमारतींची ओळख आलिशान या सदरात होते त्यात डीएसके यांनी साकारलेल्या ‘दुर्गामाता’ प्रकल्पाचा उल्लेख आवर्जून केला जातो. आजच्या घडीला १५०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या डीएसके यांनी आतापर्यंत ३० आलिशान असे बांधकाम प्रकल्प साकारले आहेत. बांधकाम क्षेत्रासोबतच आता कंपनी इतर क्षेत्रातही विस्तारत असून, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल, वाहन वितरण, ट्रेडिंग हाऊस, आयात-निर्यात, अभियांत्रिकी आदी क्षेत्रांत आता कंपनीने विस्तार केला आहे.कोलते-पाटील डेव्हलपर्स लि.- राजेश पाटील, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, ‘क्रिएशन, नॉट कन्स्ट्रक्शन’ हे सूत्र केंद्रस्थानी ठेवत, गेली दोन दशके महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बांधकाम व्यावसायिक म्हणून कोलते-पाटील समूह प्रसिद्ध आहे. राजेश पाटील यांच्या या प्रसिद्ध कंपनीचे पुण्यामध्ये मुख्यालय असून, कंपनीची नोंदणी राष्ट्रीय शेअर बाजार व मुंबई शेअर बाजारात आहे. महाराष्ट्रासोबत बंगलोरमध्येही कंपनीने मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प सादर केले आहेत. पुणे आणि बंगलोर अशा दोन शहरांत मिळून कंपनीने आजवर तब्बल एक कोटी चौरस फुटांचे बांधकाम केले आहे. मुंबईतही आता कंपनीने काही मोठ्या पुनर्वसन प्रकल्पांचे काम सुरू केले आहे. दूरदृष्टी आणि धडाडी असे राजेश पाटील यांचे नेतृत्व ओळखले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने गृहनिर्माण संकुलांसोबतच कमर्शियल, रिटेल, आयटी पार्क आणि सर्वसमावेशक अशा निवासी संकुलांची उभारणी केली आहे. केवळ बांधकाम नव्हे, तर उभारल्या जाणाऱ्या वास्तूमध्ये परिसराचे प्रतिबिंब आणि स्थापत्यशास्त्राचा उत्कट नमुना यांचा अंतर्भाव करत, बांधकाम क्षेत्राला नवा आयाम देण्याचा वसा कंपनीने घेतला आहे. प्रकल्प बांधणीत तंत्रज्ञानाचा कल्पकतेने वापर करतानाच पर्यावरणस्नेही ओळख जपणे आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करणे ही कंपनीची ओळख आहे. राजेश पाटील हे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत, तर मिलिंद कोलते हे कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत.मगरपट्टा टाऊनशिप डेव्हलपमेंट अॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनी लि.- सतीश मगर, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकनिवासी संकुलात देशपातळीवर अभिनव प्रयोग म्हणून ओळख असलेल्या आणि त्यासाठी गौरविलेल्या ‘मगरपट्टा सिटी’ने या क्षेत्रात नवा मापदंड तयार केला आहे. धडाडीचे व महत्त्वाकांक्षी नेतृत्व अशी ओळख असलेल्या सतीश मगर यांच्या कल्पनेतून ४३० एकरवर साकारलेले सॉफ्टवेअर पार्क व निवासी संकुल असा हा प्रयोग आहे. सर्व सुविधांनी युक्त अशा या संकुलात देशा-परदेशांतील अनेक अग्रेसर कॉर्पोरेट कंपन्या कार्यरत आहेत. उत्तम शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवासुविधा, स्मार्ट होम्स, मनोरंजनाच्या सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग व २४ तास सुरक्षा अशा सुविधा तेथे असून, सतीश मगर यांची दूरदृष्टी यातून दिसते. पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या सतीश मगर बांधकाम क्षेत्रात गेली अडीच दशके कार्यरत आहेत. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर आणि क्रेडाई या प्रमुख औद्योगिक संघटनांचे प्रमुख म्हणून मगर यांनी काम केले आहे. शास्त्रशुद्ध प्रशिक्षण व व्यवस्थापन असे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी त्यांनी साकारलेली ‘मगरपट्टा सिटी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजी’ त्यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाची साक्ष देते.एक्झर्बिया डेव्हलपर्स लि. - राहुल नहार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एक्झर्बिया डेव्हलपर्स लि.परवडणारी घरे व आलिशान आणि संकल्पनेवर आधारित घरांच्या व गृहनिर्माण प्रकल्पांच्या उभारणीत अग्रगण्य विकासक कंपनी म्हणून राहुल नहार यांच्या एक्झर्बिया डेव्हलपर्स लि.चे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सध्या देशामध्ये परडवणाऱ्या दरातील घरांच्या निवाऱ्यासाठी सातत्याने चर्चा कानावर पडत आहेत. मात्र ही चर्चा जरी सध्या सुरू असली तरी नाहर यांची कंपनी या विषयावर २००४ पासूनच काम करत आहे. घराचे स्वप्न पूर्ण होईल अथवा कसे, या विवंचनेत असलेल्या लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम एक्झर्बिया कंपनीने सुरुवातीपासून केले आहे. याचसोबत, ग्राहकांच्या आवडीनुसार व इच्छेनुसार कस्टमाईजड् घरांची बांधणी करणे, व्हिला अथवा बंगले या क्षेत्रातही कंपनीने मोठे काम केले आहे. कमर्शियल इमारतींच्या बांधकामातही कंपनीचा लौकिक आहे. कंपनीचे मुख्यालय पुण्यात असून पुणे व मुंबईसोबत अनेक ठिकाणी कंपनी कार्यरत आहे. लोढा डेव्हलपर्स प्रा. लि.- अभिषेक लोढा, व्यवस्थापकीय संचालक भारतीय बांधकाम उद्योगाचा आंतरराष्ट्रीय चेहरा, गुणवत्ता, भव्यता आणि ब्रॅण्ड अशी लोढा समूहाची ओळख आहे. ज्या मोजक्या कंपन्या भारतासोबतच परदेशातही व्यवसाय करतात, त्यात या समूहाचे नाव घ्यावे लागेल. १९८० साली स्थापन झालेल्या कंपनीने ३५ वर्षांत अनेक राज्यांतून विस्तार केला. इंग्लंडमध्येही कंपनीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आज देशात आणि परदेशातील कंपनीचे २८ भव्य प्रकल्प सुरू आहेत. कंपनीच्या ताब्यात तब्बल ६२०० एकर इतकी लँड बँक आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने ७७९० कोटी रुपयांच्या विक्रीचा टप्पा ओलांडला. कंपनीने जगातील नामवंत बिल्डरांसोबत करार करून अनेक भव्य प्र्रकल्प साकारले आहेत. आलिशान प्रकल्प ही लोढांची ओळख आहे. एका बिल्डिंगपुरती मांडणी नव्हे, तर परिसराला नवी ओळख निर्माण करून देणे हे लोढांचे वैशिष्ट्य आहे. २०१० मध्ये कंपनीने एमएमआरडीएकडून ४०५३ कोटी रुपयांना वडाळा येथे भूखंड खरेदी करून ‘न्यू कफ परेड’ हा मुंबईच्या श्रीमंतीची ओळख विस्तारणारा प्रकल्प हाती घेतला, तर ‘वर्ल्ड १’सारखा उत्तुंग प्रकल्प साकारण्याचे श्रेयही त्यांच्या नावे आहे. बांधकाम क्षेत्रात रोजगारनिर्मिती करण्यातही लोढा यांची कंपनी देशात अग्रेसर आहे.