ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 8 - व्हॉट्सअॅप ग्रुपवर भारत-पाकिस्तानमध्ये सध्या असलेल्या संबंधांबद्दल वादग्रस्त फोटो ग्रुपवर शेअर करून हिंदू-मुस्लिम धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करून भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी गौरवाड (ता. शिरोळ) येथील ग्रुप अॅडमिनला कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी मोहसिन मोझम कोल्हापुरे (वय ३०) असे त्याचे नाव आहे. शिरोळ तालुक्यात या घटनेचे जोरदार पडसाद उमटले. संतप्त तरुणांनी आरोपीच्या दुकानावर हल्ला चढवीत तोडफोड केली.
अधिक माहिती अशी, मोहसिन कोल्हापुरे याचा न्यू कोल्हापुरे व्हॉट्स अॅप ग्रुप आहे. त्याचा तो स्वत: अॅडमिन आहे. दि. ३ ऑक्टोबर रोजी त्याने आपल्या मोबाईलवरून ग्रुपवर फोटो शेअर केला. त्या फोटोत एक पक्षी दुसºया पक्ष्याची शिकार करीत होता. शिकारी पक्ष्याच्या पंखावर पाकिस्तानचा झेंडा छापलेला होता. सध्या भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या संबंधांबद्दल वादग्रस्त फोटो ग्रुपवर शेअर करून, हिंदू-मुस्लिम धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करून भारताच्या राष्ट्रध्वजाचा त्याने अपमान केला. हा प्रकार ग्रुपवरील सदस्य शुभम दिलीपकुमार कुंभाजे (२०, रा. गौरवाड) याच्या लक्षात आल्यानंतर त्याने कुरुंदवाड पोलिस ठाण्यात संशयित ग्रुप अॅडमिन मोहसिन कोल्हापुरे याच्याविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी कलम १५३, ५०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
दरम्यान, या घटनेचे शिरोळ तालुक्यात पडसाद उमटले. संतप्त जमावाने कोल्हापुरे याच्या दुकानावर हल्ला चढवीत तोडफोड केली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ कारवाई करून जमावाला शांत केले. या संपूर्ण घटनेचा व तपासाचा अहवाल कुरुंदवाड पोलिसांनी पोलिस महासंचालकांना पाठविला आहे.