मुंबई : राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. तसेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचेही नाव होते. यावरून आज पवार ईडीच्या कार्यालयात जाणार होते. मात्र, ईडीचा खुलासा आणि पोलिसांच्या विनंतीनंतर शरद पवारांनी जाणे रद्द केले होते. यानंतर काही वेळातच अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. याचे कारण शरद पवार यांनी सांगितले आहे.
अजित पवारांनी मोबाईल बंद ठेवल्याने मोठी खळबळ उडाली होती. राजीनाम्यानंतर शरद पवारांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याचे कारण सांगितले. दरम्यान, शरद पवार हे मुंबईहून पुण्यातील पूरग्रस्तांना भेटण्यासाठी निघाले होते. यावेळीच अजित पवारांनी राजीनामा दिल्याने शरद पवारांनी पूरग्रस्तांच्या भेटीला अरण्येश्वरला न जाता पुण्यातील मोदीबागेतील राहत्या घरी पत्रकार परिषद आयोजित केली.
ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात माझे नाव देण्यात आले. मात्र, मी कोणत्याही बँकेचा संचालक नव्हतो. म्हणून मी ईडीच्या कार्यालयाता जाणार होतो. मात्र, रात्री ईडीकडून पत्र आले की मी येऊ नये. तरीही मी जाण्याचा निर्णय घेतला होता. पोलिस आयुक्त दोनदा माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विनंती केली. 144 कलम लागू केले आहे. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आले आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्था सांभाळावी म्हणून ईडीच्या कार्यालयात जाऊ नये अशी त्यांनी विनंती केली. त्यानुसार मी चर्चा केली आणि कार्यकर्त्यांना अडविल्याचाही आढावा घेतला. त्यानुसार मी ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला आणि पुण्याकडे निघालो.
यानंतर मी खडकवासलाभागात पूरग्रस्तांती भेट घेतली, पुण्यात येत असताना आणखी एक बातमी आली की अजित पवार यांनी राजीनामा दिला. याची चर्चा त्यांनी केली नव्हती. त्यांनी राजीनामा का दिला याचीही माहिती माझी नव्हती. यामुळे कुटुंबप्रमुख म्हणून माझी जबाबदारी होती. ती मी त्यांच्या मुलांकडून जाणून घेतल्याचे शरद पवार यानी सांगितले. अजित पवार यांनी आजच त्यांच्या मुलांशी चर्चा केली.
त्यांच्याशी संपर्क साधला असता अजित पवार यांच्या राजीनाम्यामागचे कारण समजले. सहकारी संस्थांमध्ये मी अत्यंत काळजीपूर्वक काम करत असतो. सहकारी संस्थांमध्ये विशेषता शिखर बँकांमध्ये अडचणी आल्या तर त्या बँकांना मदत कशी करायची यामुळे काही निर्णय हे राज्य सरकारी बँकेने घेतलेले आहेत. याची चौकशी करण्याचे आदेश आलेले आहेत. याची आपल्याला भीती नाही. हे त्यांनी मुलांना सांगितल्याचे शरद पवारांनी सांगितले.
पण मी अस्वस्थ आहे. कारण काका(शरद पवार) यांचेही नाव यामध्ये घेण्यात आले. यामुळे मी खूप अस्वस्थ आहे. त्यांना सभासदसुद्धा नसताना चौकशीचे शुक्लकाष्ठ लावले हे सहन होत नाही. राजकारणाची पातळी घसरलेली आहे. आपण यातून बाहेर पडलेले बरे, शेती किंवा व्यवसाय करू, असे अजित पवार मुलांना म्हणाल्याचे शरद पवार यांनी सांगितले.