नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासाठी सुरू असलेल्या संघर्षात बुधवारी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगापुढे ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हुकूमशाही वृत्तीचे होते तर त्यांची बिनविरोध निवड होत असताना अजित पवार गटाने त्यांच्या विरोधात निवडणूक का लढली नाही, असा सवाल कामत यांनी केला.
कामत यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान १९७८ पासूनच्या निकालांचे दाखले दिले. निवडणूक आयोगाचा निकाल येण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच, असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात येत असल्याचे कामत यांनी निदर्शनाला आणून दिले. शरद पवार यांची अध्यक्षपदी निवड होत असताना त्यांना गावपातळीपासून राष्ट्रपातळीपर्यंत कोणीही विरोध केलेला नव्हता, असे नमूद करून अजित पवार गटाची कृती विश्वासघातकी ठरल्याचा आरोप कामत यांनी केला.