मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित येत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यावेळी शिवसेनेबरोबर युती करण्यास अजित पवारांचा विरोध होता. त्यांचा हा विरोध नेमका का आणि कशामुळे होता? यासंदर्भात 'ट्रेडिंग पॉवर'पुस्तकात मोठा दावा करण्यात आला आहे. यामुळे, त्यावेळी पडद्यामागे नेमके काय झाले? कुठल्या घटना घडामोडी घडल्या? हे उघड झाले आहे.
प्रियम गांधी या, या पुस्तकाच्या लेखिका आहेत. त्यांच्या या पुस्तकातून फडणवीस-पवार यांच्या शपथविधीच्या पडद्यामागे नेमके काय घडले यासंदर्भात धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. "अजित पवारांचा तात्विक आणि राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास विरोध होता आणि यामुळेच त्यांनी फडणवीसांबरोबर हात मिळवणी केली," असा दावा या पुस्तकात करण्यात आला असल्याचे वृत्त टीव्ही ९ने दिले आहे.
एका नेत्याचा हवाला देत, या पुस्तकात म्हणण्यात आले आहे, की, "राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा शिवसेनेशी आघाडी करण्याचा निर्णय चुकीचा आहे, शिवसेनेला पाठिंबा दिला तर राष्ट्रवादीचे मोठे नुकसान होऊ शकते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाटत होते. एवढेच नाही, तर या निर्णयामुळे आपली राजकीय कारकिर्दही खराब होण्याची भीती अजित पवारांना वाटत होती," असेही या पुस्तकात म्हणण्यात आले आहे.
या आमदारांचा होता पवारांना पाठींबा - भाजपसोबत येताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय संवाद झाला? हेदेखील या पुस्तकात सांगण्यात आले आहे. यानुसार त्यावेळी अजित पवार यांनी फडवणवीसांना, आपल्याकडे या घडीला 28 आमदार आहेत, मी जे म्हणेन ते ते करतील, तुमच्याकडे असलेले संख्याबळ आणि अपक्ष आमदार यांच्या ताकदीवर आपण बहुमत मिळवू शकू, असे म्हटले होते. यावर फडणविसांनी पवारांना त्या आमदारांची नावेही विचारली होती. तेव्हा अजित पवारांनी, सुनील शेळके, संदीप क्षीरसागर, राजेंद्र शिंगणे, सुनील भुसारा, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनील तिंगरे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा, नितीन पवार, अनिल पाटील शिवाय तेरा आणखी, अशी नावे सांगितली होती, असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे.