मुंबई – अलीकडेच ठाकरे गटाच्या कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला. त्यात युवासेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना बढती मिळाल्याचे दिसले. ठाकरे गटानंतर शिंदे गटानेही युवासेनेची नवी कार्यकारणी जाहीर केली. त्यात आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्याचसोबत आदित्य ठाकरेंचे मित्र राहुल कनाल यांची युवासेना सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली. युवासेनेतील आदित्य ठाकरेंच्या जुन्या सहकाऱ्यांनी आदित्यची साथ का सोडली याबाबत सविस्तर सांगितले.
पूर्वेश सरनाईक यांनी म्हटलं की, माझी कार्याध्यक्षपदी निवड झाली त्यानंतर उबाठा गटाच्या आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई वगळता प्रत्येकाचे शुभेच्छांसाठी फोन आले. त्या सगळ्यांनी त्यांची नाराजी माझ्याकडे व्यक्त केली. लवकरच त्यांच्या युवासेनेच्या कोअर कमिटीत जे उरलेले सदस्य आहेत ते लवकरच आमच्या युवासेनेत सहभागी होतील आणि निश्चित त्यांना न्याय देण्यात येईल. ज्या लोकांना सचिव करायला हवे होते तिथे त्यांना डावलले गेले. एक नेता आणि त्याच्या आजूबाजूला फिरणारी ही मंडळी आहेत. आदित्य ठाकरे नेता आहे की, युवासेनेतील दुसरं कोणी नेतृत्व करतंय याबाबत गोंधळ आहे. त्या नेत्याच्या आसपास असलेले प्रमुख पदाधिकारी असतील त्यांनाच न्याय देण्यात येतो. जेव्हा युवासेनेची स्थापना झाली तेव्हापासून ज्यांनी काम केले त्यांना न्याय द्यायला हवा होता. परंतु परदेशातून आलेल्यांना संधी दिली गेली. त्यावेळी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी युवासेना वाढवली. या लोकांना स्थान देऊ शकला नाहीत. परंतु नवीन आलेल्यांना स्थान दिले गेले असा आरोप त्यांनी केला.
तर आदित्य ठाकरे माझे जीवलग मित्र होते, मित्राने कधी साथ सोडायला नको होती अशी माझी इच्छा होती. पण माझ्याविरोधात कुणीतरी त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला गेला. काही लोकांनी तुमच्या नेतृत्वाला इतर लोकांपर्यंत न पोहचवण्यासाठी जे स्वत:ला मोठे केले आहे अशा लोकांना तुम्ही दूर करा तुमचे भविष्य चांगले आहे असंही पूर्वेश सरनाईक यांनी म्हटलं. दरम्यान, नातं नेहमी राहते, एकतर्फी नाते निभावलं जात नाही. त्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न व्हायला हवेत. नाते टिकवणे प्रत्येक नेत्याचे कार्यकर्त्याचे काम असते. परंतु संवाद राहिला नाही अंतर वाढत जाते, आम्ही आमचे काम करू, आमच्या कामातून आम्ही सामना करू असं म्हणत आदित्य ठाकरेंकडून संवाद कमी झाल्याचा आरोप राहुल कनाल यांनी केला.