संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन पदक मिळविणारे मोठे खेळाडू उत्तेजकाच्या विळख्यात अडकल्याची काही प्रकरणे आपल्याला माहिती आहेत. उत्तेजके घेण्याचा प्रकार आता इतका सर्रास झाला आहे की, पूर्वी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घेणारी उत्तेजके आता गल्लीबोळातल्या स्पर्धेत घेतली जात असतील तर त्यात नवल वाटायला नको.
काही दिवसांपूर्वीच रायगडला पोलिस भरतीत तीन तरुणांकडे उत्तेजके सापडल्याचा धक्क्कादायक प्रकार उजेडात आला. तांबड्या मातीतील रांगड्या कुस्ती खेळातही याचा शिरकाव झाला आहे. नैसर्गिक शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक बळ मिळविण्याच्या नादात खेळाडू उत्तेजके घेत असतात. त्यामुळे पुन्हा डोपिंग चाचणी आणि उत्तजके चर्चेत आली आहेत.
राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था ही वेगवेगळ्या खेळातील स्पर्धेच्या दरम्यान रक्ताचे नमुने घेऊन डोपिंग चाचणी करत असते. त्यामध्ये खेळाडूने काही मादक द्रव्य घेतले आहे का, याची पाहणी केली जाते. यामध्ये काही वेळा स्टिरॉइड्स, स्टिमुलंट्स तसेच हार्मोन्स इंजेक्शन यांचा समावेश असतो.
काहीही करून स्पर्धेत यश मिळविण्यासाठी तोंडावाटे आणि इंजेक्शनद्वारे सहज उपलब्ध असणारी उत्तेजके घेतली जातात. काही खेळाडूंना त्याची इतकी सवय होते की, तो त्यांचा दैनंदिन आयुष्याचा भाग होऊन जातो.
त्यामुळे खेळाच्या मैदानातून बाहेर पडले तरी ते उत्तेजकाचे सेवन करत असतात.परिणामी त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. मात्र त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. एकामागून एक अवयव निकामी व्हायला सुरुवात झालेली असते. कोणत्याही खेळाडूने उत्तेजके घेऊ नयेत. अनेक खेळाडू कार्यक्षमता वाढविण्यासाठी हे सगळे प्रकार करतात. ऑलिम्पिक समिती दरवेळी प्रतिबंधक औषधांची नवीन यादी बनवीत असते. तोपर्यंत आणखी काही तरी औषध आलेले असते.
उत्तजके घेतल्यामुळे नैसर्गिक खेळापेक्षा अधिक वेगाने खेळाडू स्वतःला झोकून देतात. गोळ्या, इंजेक्शन, सीरप आणि अन्नपदार्थांतूनही उत्तेजके घेतली जातात. उत्तेजके घेऊन स्पर्धेत यश मिळविणे ही फसवणूक आहे. - डॉ. अली इराणी, स्पोर्ट्स मेडिसिन ॲण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर, नानावटी मॅक्स हॉस्पिटल
उत्तेजक घेतलेले स्पर्धक खेळात जास्त आक्रमक होतात. हृदयाचे ठोके जलद गतीने वाढतात. त्यांना कळत नाही अशा पद्धतीने उत्तेजके घेतल्यामुळे त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. विशेष म्हणजे किडनी आणि इतर अवयवांच्या कार्यावर परिणाम होत असतो. रक्तचाचणी आणि लघवीच्या चाचणीतून उत्तेजके घेतल्याचे समजते. - डॉ. प्रशांत पाटील, हार्मोन्स तज्ज्ञ, एसआरसीसी हॉस्पिटल