सातारा : राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या बगलबच्च्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांचे कान भरले आहेत. याच कारणाने अनेक लोक त्यांच्यापासून दुरावले. यातूनच जिल्हा बँकेमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांनी आपल्या पराभवाचे खापर आमच्यावर फोडू नये, अशी टीका भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. जावळी तालुक्यातील सोनगाव येथे जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जिल्हा बँकेत पराभव का झाला, याचे आत्मपरीक्षण शशिकांत शिंदे यांनी करावे. मी काही मोठा कार्यसम्राट आमदार नाही आणि माझी पोहोच जिल्हाभर नाही. त्यामुळे मी सांगितले म्हणून पराभव झाला, असे त्यांचे म्हणणे अयोग्य आहे. उलट संघर्ष होऊ नये म्हणून ज्ञानदेव रांजणे यांची समजूत काढण्याचा मी प्रयत्न केला.आमदार शिंदे यांच्या उचापतीमुळेच त्यांची जावळी तालुक्यातील जनमानसातली प्रतिमा खालावली आहे. त्यांनीच पहिल्यांदा जावळी तालुक्यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आपल्याच पक्षाच्या जवळच्या लोकांना पाडापाडीचे राजकारण केल्याचे त्यांनी सांगितले.
पराभवाचे खापर आमच्यावर कशासाठी फोडता? शिवेंद्रसिंहराजेंची शशिकांत शिंदेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 7:28 AM